वनविभाग-प्रशासनाची गोची, बिबटय़ाने दुसरीकडे स्थलांतर केले काय?
बेळगाव / प्रतिनिधी
दिसला गं बाई दिसला… मला इथं दिसला.. मला तिथं दिसला… असे म्हणत असतानाच आता शोधू कुठे…? असे म्हणण्याची वेळ वनविभाग आणि बेळगावकरांवर आली आहे. बिबटय़ा दिसल्यानंतर अनेक अतिउत्साही असलेली मंडळी मला रात्रीच्यावेळी या ठिकाणी दिसला असे सांगत होते. त्यामधील काहीजणांनी खरे सांगितले असेल. मात्र काही जणांनी केवळ थापाही मारल्या. त्यानंतर मात्र पहाटेच्यावेळी चक्क रस्त्याशेजारून पळत जाणारा बिबटय़ा वाहनचालकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि रेसकोर्स परिसरातच बिबटय़ाने ठाण मांडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर धावपळ करत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र आता शोधू कुठे म्हणण्याची वेळ साऱयांवर आली आहे.
बिबटय़ाने गेल्या महिनाभरापासून बेळगाव परिसरात धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे वनविभाग, पोलीस प्रशासन आणि इतर कर्मचाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बिबटय़ा अचानक दिसतो, त्यानंतर गायब होतो. यामुळे बिबटय़ाला शोधू कुठे म्हणण्याची वेळ साऱयांवर आली आहे. बिबटय़ाच्या या लप्पाछुप्पीमुळे बिबटय़ाला शोधू कुठे? असे म्हणावे लागत आहे.
दिसला गं बाई दिसला… असे म्हणतानाच आता शोधू कुठे… म्हणून मुधोळचे श्वान, प्रशिक्षित हत्ती व कर्मचारी धावाधाव करीत आहेत. बेळगाव येथील रेसकोर्स परिसरात बिबटय़ाचा वावर असताना मंडोळी परिसरातही शुक्रवारी बिबटय़ासदृश प्राणी आढळल्यामुळे वनविभाग चक्रावून गेले आहे. प्रारंभी शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र ती नियोजनबद्धरित्या राबविण्यात आली नाही. त्यामुळे बिबटय़ा निसटला होता.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
बिबटय़ामुळे शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बिबटय़ाच्या शोधासाठी मोठा खर्चही करण्यात येत आहे. मात्र बिबटय़ा काही हाताला लागत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या शेजारून पळणाऱया बिबटय़ाचा व्हिडिओ एका वाहनचालकाने केला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दिसला गं बाई दिसला… म्हणत असतानाच आता शोधू कुठे… म्हणण्याची वेळ आली आहे.
सध्या वनविभाग या परिसरात पाहणी करत आहेत. मात्र आतापर्यंत तरी अपयश आले आहे. गेल्या चार दिवसांपासून रेसकोर्स परिसरात बिबटय़ा असल्याचा एकही पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे बिबटय़ाने तेथून दुसरीकडे स्थलांतर केले आहे का? याबाबत आता चर्चा सुरू आहे.









