संयुक्त राष्ट्रसंघात केला होता भारतावर आरोप
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतातून फरार झालेल्या नित्यानंदची शिष्या विजयप्रियाने 1 मार्च रोजी जिनिव्हात झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारतावर अनेक आरोप केले होते. भारताकडून नित्यानंद यांचा छळ केला जात असल्याचे विजयप्रिया यांनी म्हटले होते. परंतु आता विजयप्रिया यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
भारताच्या विरोधात मी काहीच बोलले नव्हते. आम्ही भारताचा आदर करतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांमधील हिंदूविरोधी घटक माझ्या वक्तव्याला जाणूनबुजून चुकीच्या अर्थाने मांडत असल्याचा दावा विजयप्रियाने केला आहे.
भारत सरकारने या हिंदूविरोधी घटकांवर कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. हे घटक कैलाशा विरोधात सातत्याने हिंसा भडकवत आहेत. हिंदूविरोधी लोक भारतीय लोकसंख्येचा अत्यंत छोटा हिस्सा आहेत. त्यांचे कृत्य पूर्ण भारताला आरोपीच्या पिंजऱयात उभे करू शकत नाही. हिंदूविरोधी लोकांच्या कारवाया संपविण्यासाठी भारत सरकारने पावले उचलणे आवश्यक असल्याचे विजयप्रियाने म्हटले आहे.
स्वीत्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ बैठकीदरम्यान कथित कैलाशाच्या प्रतिनिधी विजयप्रियाने आर्थिक आणि सामाजिक हक्कांसोबत शाश्वत विकासावरील चर्चेत भाग घेतला होता. नित्यानंदनेच ट्विट करत याची माहिती दिली होती.
नित्यानंदवर भारतात महिलांवर बलात्कार अन् त्यांच्या अपहरणाचा आरोप आहे. 2019 मध्ये नित्यानंद देशातून फरार झाला होता. त्यानंतर त्याने अमेरिकेनजीक ‘रिपब्लिक ऑफ कैलाशा’ नावाचा एक वेगळा देश स्थापन केल्याचा दावा केला होता. परंतु अद्याप त्याच्या या कथित देशाला कुठल्याच देशाने मान्यता दिलेली नाही.









