थेट शूज टेबलावर ठेवत झाली कुस्तीमधून निवृत : कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण यांचाच वरचष्मा, निकालाने नाराज होत घेतला कठोर निर्णय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याच पॅनेलची नियुक्ती झाली आहे. संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. मात्र ज्या ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत तब्बल 40 दिवस दिल्लीत आंदोलन करुनही, त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल, तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असे म्हणत साक्षी मलिक ढसाढसा रडली. यादरम्यान साक्षी भावूक झाली आणि तिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली. यावेळी साक्षीने शूज उचलून टेबलावर ठेवले आणि तिथून उठून निघून गेली.
गुरुवारी भारतीय कुस्ती महासंघाचे सर्व निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत ब्रिजभूषण यांच्या समर्थकांचा वरचष्मा पहायला मिळाला. संजय सिंह हे अध्यक्ष झाले. संजय सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांच्या अत्यंत जवळचे मानले जात आहेत. या निवडीनंतर सर्व ब्रिजभूषण समर्थकांनी जल्लोष केला. त्यात संजय सिंह देखील होते. दरम्यान, या निकालानंतर साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत कुस्तीला रामराम केला.
आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशातील अनेक लोकांनी आम्हाला पाठिंबा देखील दिला. जर ब्रिजभूषण सिंह यांचा जवळचा सहकारी अध्यक्ष होणार असेल तर कुस्ती सोडलेली बरी. माध्यमांशी बोलताना साक्षी भावूक झाली होती. बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू होते. यावेळी आंदोलन करत असताना देशवासियांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. हा लढा असाच पुढे सुरु राहणार असल्याचे ती यावेळी म्हणाली. यावेळी साक्षी सोबत बजरंग पुनिया व विनेश फोगट उपस्थित होते. 31 वर्षीय साक्षीने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 58 किलो वजनी गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकले आणि महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली. याशिवाय 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक, 2018 मध्ये कांस्यपदक आणि 2014 मध्ये रौप्यपदक जिंकले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने चार वेळा देशाला मेडल मिळवून देण्यात यश मिळवले होते.









