मडगाव : आपण कधीही आणि कोणाकडेही मंत्रिपदाची मागणी केलेली नाही. आपल्याला जे पद मिळालेय, त्या पदाला आपण पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे पद मिळाले, त्यातून लोकहिताची कामे हाती घेतलीय, तसेच आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे सभापती रमेश तवडकर काल बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर गोव्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील अशा बातम्या समोर येत आहे. त्यात सभापती रमेश तवडकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी वरीलप्रमाणे उद्गार काढले. आपण लोकहितासाठी सातत्याने कार्यरत असतो. श्रमदानातून आपण लोकांना निवारा उपलब्ध करून दिलेला आहे.
आता तर आपण शंभर घरांची मोख ठेवलीय. आज ‘लोकोत्सवा’च्या माध्यमातून आपण स्थानिकांना तसेच आपल्या कार्यकर्त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हल्लीच बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पेडणे ते काणकोणपर्यंत रॅली काढली. तिला जनेतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आपले कार्य हे सदोदीत चालू असते. त्यामुळे मंत्रिमंडळात असलो काय अन् नसलो काय काही फरक पडत नाही, असे तवडकर म्हणाले. लोकोत्सवाचे आयोजन करून आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचे नाही. लोकोत्सव 1994 पासून सुरू आहे व यंदा 24 वर्षे होत आहेत. माझी कोणासोबत स्पर्धा नाही. दरवर्षी लोकोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळत आलाय. एसटी समाजात दुफळी आहे, असे आपण मानत नाही. बोटावर मोजण्याइतपत लोकांनाच तसे वाटते, असेही सभापती तवडकर यावेळी म्हणाले.









