सवयींबद्दल समाज सतत प्रतिक्रिया देत असतो. चुकीच्या सवयी अन् चांगल्या सवयी यावर मतभिन्नता आढळते. सवयींनी स्वभाव घडतो आणि व्यवहारात तो दिसतो देखील. माणूस सवयीचा गुलाम असतो असे म्हणतात. खाणे, पिणे, झोपणे, कपडेलत्ते यांसह इंद्रियांनाही सवय असते. सकाळ झाली की पोट भूक लागली ही जाणीव करून देते. चहा मिळाला नाही तर डोके दुखायला लागते. पंखा नसला तर झोप लागत नाही. याबरोबरच नको तिथे सल्ला देणे अथवा आपले मत व्यक्त करण्याचीही सवय आढळते. काहीजण मात्र आपले मत व्यक्त करायचे सोडून मौन व्रत स्वीकारतात. इंद्रिये मनाचे ऐकून शरण जातात. निमूटपणे सवयींची जोपासना करतात. सवयीचा माणसाला अभिमान असतो. ते एक प्रतिष्ठेचे लक्षण म्हणूनही समाजात मिरवले जाते. पहाटे ब्राह्म मुहूर्ताला जागे होणे, सूर्योदयाच्या आत स्नान करणे, स्वच्छता पाळणे, आहाराची वेळ निश्चित असणे, वाचन-लेखन-मनन यात सातत्य राखणे या सवयी उत्तमच, परंतु त्याने माणसाचा विकास साधेल असे कुठे आहे? अध्यात्मामध्ये जीवनपथावर चालताना दोन मार्ग वर्णिले आहेत. एक श्रेयस आणि दुसरा प्रेयस. माणूस ऐहिक सुखाचे उद्दिष्ट समोर ठेवून जगत असतो तो प्रेयस मार्ग. तर मनुष्यजन्माच्या शाश्वत कल्याणाचे ध्येय समोर ठेवून जगणे म्हणजे श्रेयस मार्ग. देहसुखासाठी इंद्रियांना चांगले वळण, सवयी लावणे हा प्रेयस मार्ग स्वीकारणारे बहुसंख्य लोक सभोवती दिसतात तर तात्पुरती सुखे नाकारून शाश्वत सुखाकडे जात असामान्य वाट निर्माण करणारे संत महात्मे असतात. ते माणसाला श्रेयस मार्गाची ओळख करून देतात.
संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे- ‘आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्ता पासूनिया । पांडुरंग ध्यानी । पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग । जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चित्तात स्थापना झाली आहे ती पांडुरंगाची. तेव्हापासून ध्यानाचा, ज्ञानाचा विषय पांडुरंग. जागे असताना, स्वप्नात, मनात पांडुरंग आहे. महाराज पुढे म्हणतात, ‘पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ।’ माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे धावण्याचे वळण पडले आहे. ही ओळख महाराजांना डोळे या इंद्रियांनी करून दिली. पांडुरंगाचे ध्यान मनात ठसवून दिले. आत्मतत्त्वाने ज्ञान करून दिले ते हे शांत रूप विटेवर उभे आहे. संत तुकाराम महाराजांच्या इंद्रियांना पांडुरंग हा एकच ध्यास होता. एक दृष्टांत असा आहे, एकदा संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली जेवणांमधील पदार्थात मीठ घालायचे विसरली. महाराज शांतपणे जेवून उठले. आवली त्यानंतर जेव्हा जेवायला बसली तेव्हा तिच्या लक्षात आले की कुठल्याच पदार्थात मीठ नाही. तिने महाराजांना याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, जिभेने सांगितले असते तर कळले असते ना! जिभेला फक्त विठ्ठल हा एकच नामरस ठाऊक आहे. महाराज एका अभंगात म्हणतात, ‘विषयी विसर पडला । नि:शेष अंगी ब्रह्मरस ठसावला । माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ।’ महाराजांच्या अंतरंगात ब्रह्मरस ठसावला. त्यामुळे आता इंद्रिये विरक्त झाली आहेत. तरीपण पूर्वसंस्कारांच्या सवयीने माझी वाणी मला अनावर झाली असून तिने हरिनामाचा सारखा हट्ट धरला आहे. संत जनाबाईंचा एक अभंग आहे, ‘देव खाते देव पिते । देवावरी मी निजते ।’ पांडुरंगाशिवाय इंद्रियांना दुसरे ध्यान नाही. सगळीकडे विठाबाई अंतर्बाह्य भरून उरली आहे. संतांचा जीवनमार्ग हा शाश्वत कल्याणाचा आहे. तो सर्वांना साधेल असे मुळीच नाही. सामान्य जीव हा संसार, धन, ममता, मोह, प्रपंच यात पुरता अडकलेला असतो. या प्रेयसमार्गावरून पुढे जाताना आत्मविकास साधायचा असेल तर संतांनी सांगितलेले अनुभवाचे बोल सवयीचे करून घ्यावे लागतील. तेव्हा कुठे श्रेयसमार्गाची पाऊलवाट गवसेल.
संत एकनाथ महाराज हे लोकशिक्षक होते. समाजाला त्यांनी सन्मार्गाला लावले. एक कथा अशी आहे की एकदा एक बाई नाथ महाराजांकडे येऊन आपली व्यथा सांगू लागल्या. त्यांचे पती फक्त पैसा हेच सुख मानतात. त्यावाचून त्यांना दुसरे काही सुचत नाही. ते कधी देवळात जात नाहीत. देवाला हात जोडत नाहीत. कथाकीर्तनाला जात नाहीत. त्यांना परमार्थ करायला वेळ नाही. महाराज आपण कृपा करून त्यांना उपदेश करा. नाथांना त्या माणसाची दया आली. ते त्या बाईंना म्हणाले, तुमच्या यजमानांना उपासनेसाठी वेळ नाही म्हणालात ना? ते स्नानासाठी जातात तेव्हा मी तुमच्या घरी येईन आणि न्हाणीघराबाहेर उभा राहून रोज विष्णुसहस्रनामाचा एक श्लोक म्हणीन. संत कृपाळू असतात. नाथ महाराज रोज त्या बाईंच्या घरी गेले आणि तो माणूस स्नान करीत असता शांतपणे विष्णुसहस्रनामाचा एकेक श्लोक म्हणू लागला. असे करताकरता त्या माणसाला विष्णुसहस्त्रनाम पाठ झाले व तो ते रोज स्नान करताना म्हणू लागला. काळ स्वगतीने पुढे जात असतो. त्या माणसाचा वृध्दापकाळ आला तेव्हा तो बेशुद्धीत गेला. कफ, वात, पित्त या त्रिदोषांचा जोर वाढला की भगवंताचे स्मरण राहत नाही. इतकेच नव्हे तर आप्तांचीही ओळख शेवटच्या क्षणी पुसून जाते. त्याचे तसेच झाले; परंतु तो बेशुद्धीत असताना त्याचे अंग पुसायला म्हणून बंडीचे बटन सोडले आणि जाणिवेतून नेणिवेत गेलेले विष्णुसहस्रनाम जागे झाले. सवयीनुसार ते त्याच्या मुखात आले आणि शेवटी मरणसमयी तो विष्णूसहस्रनाम म्हणत उध्दरून विष्णूलोकी गेला.
भागवतामध्ये श्रीकृष्णाच्या बाललीला ऐकताना श्रोते रंगून जातात. एकदा एका गोपीकडे कन्हैया लोण्याची चोरी करायला गोपबाळकांसह गेला. पाहतो तर काय उंच शिंक्यावर लोणी ठेवलेले होते आणि त्यावर एक घंटा बांधली होती. अर्थात शिंक्याला हात लावला की घंटा वाजू लागणार. चोरी पकडली जाणार. कन्हैया त्या घंटेला म्हणाला, ‘हे बघ, भक्त देवळात आल्याची वर्दी तू देतेस. सतत वाजत असतेस. आज मात्र गप्प बैस’. घंटा हो म्हणाली. लोणी साऱ्या गोपाळांनी फस्त केले आणि शेवटी छोटासा कण श्रीकृष्णाने ओठाला काय लावला की घंटा वाजू लागली. चोरी उघडकीस आली. कृष्ण म्हणाला, ‘अगं तुला म्हटले ना आज शांत रहा तरीही तू…..?’ घंटा म्हणाली, ‘तसे नाही रे कान्हा. नैवेद्य दाखवला की वाजायची मला सवय आहे. तुझ्या मुखाला लोण्याचा कण लागला आणि मी माझ्याही नकळत वाजू लागले’. सवय ही गतिशील असेल तर ती आत्मविकासाची वाट दाखवते.
माणसाने जेव्हा प्राणी पाळून त्यांच्याकडून युक्ती, शक्ती वापरून कामे करून घ्यायला सुरुवात केली तेव्हा बैलाला वेसण, घोड्याला लगाम, हत्तीला अंकुश, उंटाला नकेल लावले आणि स्वत:च्या ताब्यात ठेवले. त्यामुळे मोठमोठी कामे पशुंकडून आजही होतात. बुद्धिमान माणसाने जर स्वत:च्या इंद्रियांना सैल न सोडता भगवंताच्या नामाचा छंद लावला तर ती सवय त्याला भक्तीच्या वाटेवरून सरळ परमार्थाच्या घरापाशी नेऊन सोडेल, एवढे मात्र नक्की!
– स्नेहा शिनखेडे








