कराड :
शहराच्या प्रवेशद्वारावर साजेसा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला ‘आय लव्ह कराड’ सेल्फी पॉइंट सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. चारी बाजूंनी वाढलेल्या गाजर गवतामुळे त्याचे सौंदर्य पार झाकले गेले आहे. शिवाय सेल्फी पॉइंटच्या आयलॅण्डची काही ठिकाणी पडझड झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत उभारलेला हा पॉइंट कराडकरांसाठी अभिमानाचा विषय, मात्र सध्या त्याची अवस्था बघून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
कराडच्या कोल्हापूर नाक्यावर असलेला ‘आय लव्ह कराड’ सेल्फी पॉइंट म्हणजे शहराच्या स्वागताचे दार, कोल्हापूर किंवा पुणे दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या हजारो वाहनधारकांचे लक्ष या पॉइंटवर पडते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावे असलेल्या कमानीखाली उभा करण्यात आलेला हा ‘आय लव्ह कराड’ सेल्फी पॉइंट कराडनी नवी ओळख बनली. अनेक स्थानिक नागरिक इथे थांबून फोटो काढण्यास उत्सुक असत. मात्र सध्या गवत व झुडपांनी वेढलेला हा पॉइंट दुर्लक्षित झाला आहे. गाजर गवत वाढल्यामुळे या ठिकाणी अस्वच्छतेचे चित्र प्रकर्षाने जाणवते. झाडाझुडपांमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या रिकाम्या पाकिटांचा खच पडलेला दिसतो. हे दृश्य पाहून नागरिकांच्या मते हा भाग सातत्याने स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही साफसफाई न झाल्याचे चित्र आहे. कराडची ओळख म्हणून उभा केलेला हा सेल्फी पॉइंट जर अस्वच्छ, गवताळ बनत असेल तर श्थे थांबून फोटो काढण्याऐवजी लोक चटकन नजरेआड करण्यास प्राधान्य देतात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे ‘आय लव्ह कराड’ सेल्फी पॉइंट हे केवळ सौंदर्यस्थळ नाही तर तो कराडकरांचा अभिमान आहे. पण त्याची सध्या जी अवस्था आहे ती नक्कीच निराशाजनक आहे. पावसाळ्यात गाजर गवत झपाट्याने वाढते. हे ठावूक असतानाही त्या अनुषंगाने कोणतीही पूर्वतयारी प्रशासनाने केली नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. यामुळेच नागरिकांत अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. काही सामाजिक कार्यकत्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत स्वच्छता विभागाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे.
- काय करायला हवे…
कोल्हापूर नाक्यावर नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कायम वर्दळ असते.
वाहतूक कोंडी होत असते हे खरे असले तरी सेल्फी पॉइंट परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गरज आहे
त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून किमान महिन्यातून दोन वेळा तरी या परिसरातील स्वच्छता करायला हवी
तेथे सुशोभीकरणासाठी लावलेली लाईट व्यवस्था दुरूस्त करण्याची आवश्यकता आहे








