वृत्तसंस्था/ बेकेनहॅम, ब्रिटन
भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने संघाच्या गरजेनुसार कामगिरी करण्यास आपण शिकलो असल्याचे म्हटले आहे. आता इंग्लंड दौऱ्यात आपला आयपीएलमधील फॉर्म कायम ठेवण्याच्या प्रयत्नात तो आहे. दुखापतींमुळे बराच काळ मैदानापासून दूर राहावे लागल्यानंतर प्रसिद्धने यंदाच्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला आणि लीगचा सर्वाधिक बळी घेणारा आणि पर्पल कॅप जिंकणारा गोलंदाज म्हणून तो उदयास आला.
तो आता 20 जूनपासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविऊद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उत्सुक आहे. ‘संधी येत असतानाच तुम्ही लक्ष केंद्रीत केले पाहिजे’, असे तो म्हणाला. जेव्हा तुम्हाला परिस्थितीची जाणीव होते तेव्हा तुम्ही तुमच्या संघाला विशिष्ट परिस्थितीत आपला पाठिंबा मिळेल याची खात्री करता. कारण खेळात काहीही घडू शकते, हेच क्रिकेटचे सौंदर्य आहे. मला वाटते की, आम्ही सर्व जण कधी स्विच ऑन आणि स्विच ऑफ करावे हे जाणण्याइतपत पुरेसेअ अनुभवी आहोत’, असे प्रसिद्धने बीसीसीआय टीव्हीला सांगितले आहे.
वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे बाजूला राहून दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर प्रसिद्ध कृष्णा पुन्हा क्रिकेटमध्ये परतला आहे, ज्यामुळे त्याच्यावर खास नजर राहील. आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या सर्वांत प्रभावशाली खेळाडूंपैकी एक राहिलेला प्रसिद्ध म्हणाला की, मोठ्या कसोटी मालिकेपूर्वी ब्रिटनमध्ये खेळण्याचा जो वेळ संघाला मिळाला आहे त्याचा खूप फायदा देईल. सराव सामन्यात मिळालेली खेळपट्टी छान दिसते. गोलंदाजांनी काही खरोखर चांगले स्पेल टाकले. फलंदाजांनीही आपले कौशल्य दाखवले. जेव्हा तुम्ही एकमेकांविऊद्ध स्पर्धा करता तेव्हा ते नेहमीच चांगले असते. आम्ही सर्व जण उत्साहित आहोत आणि जे काही घडत आहे त्याचा आनंद घेत आहोत, असे भारताचा वरिष्ठ संघ व भारत ‘अ’ यांच्यातील सराव सामन्याच्या शुक्रवारच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर तो म्हणाला.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यात पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिल आणि के. एल. राहुलने अर्धशतके झळकावली, तर शार्दुल ठाकूरचा बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये समावेश राहिला.









