शशी थरूर यांनी काँग्रेसला सुनावले
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पक्षात स्वत:च्या विरोधात उपस्थित होणाऱ्या आवाजांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जर राष्ट्रहितात काम करणे पक्षविरोधी असेल तर अशाप्रकारचे आरोप करणाऱ्यांनी स्वत:लाच प्रश्न विचारायला हवेत असे थरूर यांनी म्हटले आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या शशी थरूर यांच्या वक्तव्यांवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती. तसेच थरूर यांना सरकारचा सुपरप्रवक्ता संबोधिले होते. स्वत:च्या विरोधात होणाऱ्या टीकेवर थरूर यांनी अत्यंत साध्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. जर कोणी देशाची सेवा करत असेल तर विरोध का केला जावा असे थरूर यांनी म्हटले आहे.
आम्ही विदेशात एका मिशनवर आलो आहोत. अशास्थितीत कुठल्याही उत्तेजनेत केलेल्या वक्तव्यार वेळ वाया घालविणे चुकीचे ठरेल. मी लोकसभा खासदार असून अद्याप माझा 4 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे असे त्यानी म्हटले आहे. राहुल गांधीं यांनी केलेल्या ट्रम्प यांच्या फोननंतर सरेंडर संबंधीच्या वक्तव्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. लोकशाहीत पक्षविरोधी, टीका अन् मागणी होत राहते. देशात आमच्यादरम्यान राजकीय मतभे राहतात, परंतु जेव्हा आम्ही देशाची सीमा पार करतो, तेव्हा आम्ही भारतीय ठरतो असे म्हणत थरूर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला एकप्रकारे विरोध दर्शविला आहे.









