शिरशिंगे -गोठवेवाडीतील 48 कुटुंबीयांनी आपली व्यथा मांडली अधिकाऱ्यांकडे
सावंतवाडी : प्रतिनिधी
आमचं तात्पुरतं पुनर्वसन करून आम्हाला स्थलांतरित करा. पावसाळ्यात दोन महिने आम्हाला येथे राहायला भीती वाटते . त्यामुळे या दोन महिन्याच्या कालावधीसाठी आमची कुठेतरी राहण्याची व्यवस्था करा. आमच्या काही अडचणी आहेत. त्या कायमस्वरूपी सोडवा .फक्त पावसाळा आला की आमच्या समस्यांकडे बघू नका. आम्हाला आता कायमस्वरूपी यावर तोडगा हवा आहे .अशी शिरशिंगे गोठवेवाडी येथील 48 कुटुंबीयांनी आपली व्यथा मांडली .
गोठवेवाडी येथील ज्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी भेग पडली होती, ज्या धोकादायक असलेल्या घरे व कुटुंबियांची प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर व तहसिलदार श्रीधर पाटील यांनी गोठवेवाडीत जाऊन भेट घेतली व पाहणी केली. यावेळी श्री गोठवेश्वर मंदिरात या गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी आणि ज्या घरांना धोका आहे. त्यांनी आमचं दोन महिन्यासाठी स्थलांतर करा नंतर आम्ही पाऊस संपला की पुन्हा येथे येऊ. पण, आता आम्हाला या पावसाळी कालावधीत या ठिकाणी राहण्यास भीती वाटते .आमच्या या अडचणीचा कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढा. दोन वर्ष म्हणावा तसा आमच्या मागण्यांकडे लक्ष दिला गेला नाही. फक्त प्रशासकीय पातळीवरून पाहणी होते. प्रत्यक्षात काहीच उपाययोजना दिसत नाहीत. आम्ही यापूर्वी संरक्षक भिंतीची मागणी केली होती. तीही अपुरीच आहे.
आमचं योग्य पद्धतीत स्थलांतर करा अशा अनेक समस्यांच्या भडीमारांचा पाऊस उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर पाडला. आज सोमवारी प्रांताधिकारी श्री पानवेकर व तहसीलदार श्री पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या तिन्ही अधिकाऱ्यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व यावेळी सदर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चाही केली . यावेळी सरपंच दीपक राऊळ ,माजी सरपंच सुरेश शिर्के ,जीवन लाड ,श्री पेडणेकर ,रवींद्र मडगावकर ,पंढरी राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी पानवेकर यांनी तुमच्या अडचणी निश्चित पूर्ण केल्या जातील. मात्र , तुमचे तात्पुरते स्थलांतर दोन महिन्यांसाठीच नाही तर या भागातील एकंदरीत परिस्थिती पाहून कायमस्वरूपी यावर तोडगा काढू असे सांगण्यात आले .









