अध्याय अठ्ठाविसावा
योगसाधनेमधील एका टप्प्यावर साधकाला प्राप्त होणाऱ्या सिद्धी आणि त्यांच्याकडून साधकाची होणारी छळवणूक ह्याबद्दल उद्धवाशी बोलताना भगवंत म्हणाले, योगाभ्यास करताना प्राप्त झालेल्या सिद्धींच्या आकर्षणाला साधक सहजी बळी पडतो. विशेष करून ज्याला सिद्धींच्या प्राप्तीची जाणीव नुकतीच झालेली असते, त्याच्याबाबतीत हा प्रकार हमखास घडतो. प्राप्त झालेल्या सिद्धी आपला घात करू शकतात, हे लक्षात घेऊन त्यावर तो स्वप्रयत्नाने मात करायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, सिद्धींचा उपभोग घ्यावा असे वाटणाऱ्या इच्छांना दाबून ठेवणे, इत्यादि उपाय असतात परंतु मनाचे सामर्थ्य एव्हढे जबरदस्त असते की, त्याने एखादी गोष्ट हवी म्हंटली की ती प्राप्त झाल्याशिवाय ते गप्प बसूच शकत नाही. त्या मनाला काबूत ठेवण्यासाठी मी भगवद्गीतेत म्हंटल्याप्रमाणे माणसाने इंद्रिये, मन आणि बुद्धी ह्या तिन्हीपेक्षा प्रभू थोर आहे आणि सिद्धींचा त्याग स्वप्रयत्नाने करणे केवळ अशक्य आहे असे ध्यानात आल्यावर सिद्धींच्या छळापासून स्वत:ची सुटका होण्यासाठी माझ्या भजनी लागावे.
योगाभ्यास करत असताना जो माझी भक्तीही करतो तो साधक मला थोर वाटतो. जो माझ्या भक्तीचा मार्ग अनुसरतो त्याला विघ्ने काहीही बाधू शकत नाहीत. जेथे भक्तीने माझे अनुसंधान चालू असते तेथे मी श्रीहरि प्रत्यक्ष हजर असतो आणि त्यांच्या भक्तीप्रेमात रंगून जातो. माझ्या भक्ताचं माझ्यावर निरपेक्ष प्रेम असतं. म्हणून सद्भावाने माझी भक्ती करावी म्हणजे त्यांच्या मार्गात विघ्ने आडवी येत नाहीत. मी श्रीपती अहोरात्र भक्तांचे रक्षण करत असतो. तेव्हा आत्यंतिक प्रेमाने माझी भक्ती करावी. जो योगसाधना करून माझ्या भक्तीत तल्लीन होऊन जातो तो भक्त मला अत्यंत प्रिय होतो. योगसाधना करत असताना साधकाच्या मनात कुठंतरी मी योगसाधना करतोय अशी मीपणाची भावना डोकावत असते. त्यामुळे देहबुद्धी जागृत राहून सिद्धींचे उपद्रव विघ्नांना निमंत्रण देतात. ह्याउलट माझी भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनात माझ्याप्रती संपूर्ण समर्पणाचा भाव निर्माण होतो. त्यामुळे मी पणा नाहीसा होऊन सिद्धींमुळे मनात येणारा अहंभाव समूळ नष्ट होतो. अहंभाव नष्ट झाल्याने सिद्धींचे विघ्न भक्तांना बाधू शकत नाही. अशाप्रकारे अत्यंत प्रेमाने मला शरण येऊन सर्वांच्या ठिकाणी मीच नांदत आहे अशा अभेद्बुद्धीने म्हणजे माणसामाणसातच काय, कोणत्याही इतर प्राण्यात, भेदभाव न करता जे माझे भजन करतात त्यांना विघ्ने बाधूच शकत नाहीत. माझ्या भक्ताला ज्या ज्या गोष्टी त्रास देतील असे मला वाटते त्या सर्वांचे मी निर्दालन करून टाकतो. जो माझ्याशी अनन्य झालेला असतो, त्याच्या ठिकाणी मी वस्तीला असतो. अनन्य भक्ताच्या वाट्याला विघ्ने जात आहेत असे मला दिसले रे दिसले की त्याने बोलावण्याची वाटसुद्धा न पाहता मी तेथे उडी घालतो. अरे यात विशेष असे काही नाही कारण ती माझी लाडकी बाळे असतात. ती माझी लाडकी बाळे कशी होतात असे विचारशील तर ज्याप्रमाणे लहान बाळाला फक्त आणि फक्त आईच हवी असते. त्याप्रमाणे माझ्या भक्तांना केवळ मी आणि मीच हवा असतो. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा मला साकडे घालतात त्या त्या वेळी त्यांना होणारा त्रास मी स्वत: सोसतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना कसलीही झळ बसू देत नाही. आता प्रल्हादाचंच उदाहरण घे, राजाने प्रल्हादाला शासन करायचे ठरवल्यावर मी त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्यावेळी त्याचे रक्षण केले. थोर भक्त अंबरीश राजावर संकट येतंय असं दिसल्याबरोबर मी महान ऋषी दुर्वासांचा अपमान करायला मागेपुढे बघितले नाही. दुर्वास मुनींनी अंबरीश राजाला दिलेला शाप मी माझ्यावर घेतला. शापानुसार राजाला दहा गर्भवास भोगावे लागणार होते ते सर्व मी सोसले. माझ्या भक्ताला मी कोणत्याही प्रकारचा उणेपणा येऊ देत नाही हे राजाच्या उदाहरणावरून तुझ्या लक्षात आले असेलच.
क्रमश:








