आमदार कार्लुस फेरेरा यांना जोरदार प्रत्युत्तर
पणजी : आमदार कार्लुस फेरेरा हे विरोधी पक्षात असले तरी ते वेळोवेळी भाजपला चांगले सल्ले देत असतात. भविष्यातही त्यांनी असेच सल्ले द्यावे. असे वक्तव्य खुद्द मुख्यमंत्र्यांनीच 9 महिन्यांपूर्वीच केले होते. त्याद्वारे फरेरा हे भाजपचे सल्लागारच असल्यावर शिक्कामोर्तब केले होते. अशावेळी आता ते आम्हाला माफी कसली मागायला सांगतायत, असा प्रतिसवाल करत आपचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी फेरेरा यांना उघडे पाडले आहे. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. त्यावेळी अध्यक्ष अॅड. अमित पालेकर आणि उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांचीही उपस्थिती होती. गोव्यात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कोमुनिदाद कायद्यासारखी व्यवस्था भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातसुद्धा असणार नाही. अशी व्यवस्था आमच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवली. यासंबंधी आमदार फेरेरा यांनाही संपूर्ण जाणीव असावी. त्याचप्रमाणे सध्या आणण्यात आलेल्या विधेयकास कशाप्रकारे राज्यभरातून विरोध होत आहे याचीही जाणीव त्यांना असावी, असे आपणास वाटते, असे व्हिएगश म्हणाले. अशावेळी त्यांनी सरकारने आणलेल्या विधेयकात ज्याप्रकारे काही दुऊस्ती सूचवून सरकारसाठी सल्लागाराचे काम केले व त्याद्वारे विधेयक मंजूर करण्यास मदत केली ती कुणाच्या फायद्यासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अन्य कोणत्याही विरोधकाचे म्हणणे ऐकूनसुद्धा न घेता ते विधेयक मंजूर करण्यात आले, असा आरोप व्हिएगश यांनी केला. त्यांची ही कृती पाहता आता प्रत्येक गोमंतकीयाने विचार करण्याची वेळ आली आहे. फेरेरा यांनी सांगितले म्हणून माफी मागण्यास काही हरकत नाही. परंतु ती का मागावी? कायद्याच्या 136व्या कलमानुसार विधानसभेत बोलण्याचा म्हणणे मांडण्याचा, सूचना करण्याचा अधिकार मलाही आहे. आम्ही विधेयकावर चर्चा करण्याची मागणी केली होती. ती चूक असती तर सभापतींनी मला रोखले असते. त्यावरून मी योग्य होतो, हेच सिद्ध होते. अशावेळी माफी का म्हणून मागावी, असा दावा व्हिएगश यांनी केला.
सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील कृषी जमीन राखून ठेवली पाहिजे हे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे घाईगडबडीत मंजूर करण्यात आलेल्या या विधेयक आम्ही जोरदार विरोध करतो. त्याचबरोबर त्या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येकाचा आम्ही निषेध करतो, असे व्हिएगश म्हणाले. त्यासंदर्भात पक्षातर्फे राज्यपालांनाही निवेदन देण्यात आले असून त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी व्हिएगश यांनी केली. वाल्मिकी नाईक यांनी बोलताना आमदार फेरेरा यांच्या आतापर्य भाजपशी असलेल्या जवळीकेसंबंधी अनेक कागदोपत्री पुरावे सादर केले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आपले आमदार फुटणार असल्याचा सुगावा लागल्यामुळे पक्षाने पाच जणांना चेन्नईत पाठवले. त्यात फेरेरा यांचा समावेश होता. यावरून काँग्रेसला आपल्याच आमदारांवर विश्वास नव्हता याचा पुरावा मिळतो. त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याची वेळ आली तेव्हाही काँग्रेसला फेरेरांवर विश्वास नव्हता म्हणून त्यांना बाजूला ठेवत युरी आलेमाव यांची निवड करण्यात आली. निवडणुकीपूर्वीही काँग्रेसने आपल्या उमेदवारांकडून शपथपत्रावर मंदिरात जाऊन साक्ष घेतली होती. तरीही 11 मधील 8 जण भाजपात गेले. त्यावेळी बोलताना अॅङ फेरेरा यांनी त्या शपथपत्रास काहीच किंमत नव्हती, असे सांगितले. यावरून ते लोकांना फसवत होते हेच सिद्ध होतो, असे नाईक म्हणाले अशावेळी आता फेरेरा यांच्या मागणीवरून व्हिएगश यांनी माफी का मागावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अॅड. अमित पालेकर यांनीही यावेळी विचार मांडले.









