अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, माझ्यावर ज्याची अत्यंत प्रीती असते, त्याला माझ्याशिवाय काहीच प्रिय नसते. विशेष म्हणजे त्याला त्याच्याबद्ल्यात काहीच नको असते. अशा भक्ताची माझ्यावरील प्रीती पाहून मला त्याच्याबद्दलच्या प्रेमाचे भरते येते. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असे मला होऊन जाते. त्याच्या विरहाची कल्पनासुद्धा मला सहन होत नाही. माझ्या भक्ताचा कदाचित काळ संहार करील, म्हणून मी माझ्या अंगाचा किल्लाच तयार करतो.
काळाच्या भीतीमुळेच मी आपल्या भक्तांना ब्रह्मस्वरूपाच्या मार्गाला लावितो, त्यामुळे ते कायमचे मला येऊन मिळतात. अशा माझ्या भक्तांना मी अत्यंत काळजीपूर्वक आपल्या स्वरूपात पूर्ण आत्मसुखी करून ठेवतो. असा भक्त पूर्णपणे माझेच स्वरूप असल्याने त्याचे जे स्वाभाविक कृत्य असते, तेच माझे प्रीतीचे पूजन होय. तो जे पाहतो तेच माझे दर्शन होय. आणि तो जे काय बोलतो तेच माझे खरे स्तोत्र होय. तो स्वतः भोजन करतो तेच मला नैवेद्य समर्पण केल्याप्रमाणे होते. त्याची निद्रा तीच माझी पूर्ण समाधी होय. त्याच्या डोळय़ांची जी उघडझाप चालते, तीही मला फार प्रिय वाटते. त्याच्या श्वासोच्छ्वासाची आंदोलने मला फार सुख देतात.
भक्तांच्या शरीराची जी स्वाभाविक स्थिती असते, तेणेकरून तर मी लक्ष्मीपती फारच आनंदित होतो. असे प्रेमळ भक्त मला आवडतात. माझ्या भक्तांवर माझी एकनि÷ प्रीती असते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. तसेच सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती आहेत. सर्वसामान्य माणूस हे सर्व साध्य करण्यासाठी धडपडत असतो आणि यातील काहीही साध्य झाले तरी धन्यता मानतो पण माझ्या भक्तांची गोष्टच वेगळी! ते चारही पुरुषार्थाना शिवत नाहीत आणि चारही मुक्तींना दूर लोटून प्रेमळपणाने माझीच भक्ती करतात. गंगा समुद्रात जाऊन एकरूपाने त्यात मिसळली, की ती ऐक्मयरूपाने त्याचीच होऊन त्याच्यावर लोळू लागते. त्याप्रमाणे भक्त हा भक्तीच्या सामर्थ्यांने मला मिळून माझ्या भक्तीचे सोहळे भोगतो. तरुण स्त्री तारुण्याच्या मदाने सर्वांगांनी त्या तारुण्याचा उपभोग घेत असते, त्याप्रमाणे भक्त मला मिळून माझ्या भक्तीचे सर्व प्रकारचे वैभव भोगत असतो. ज्याप्रमाणे सतराव्या कलेची गोडी चंद्र आपली आपणच जाणतो, त्याप्रमाणे मी होऊन माझे भजन कसे करावयाचे ते सज्ञानी भक्त जाणतो. जातीस्वभावाप्रमाणे पाहिले तर सर्व ठिकाणचे उदक एकच असते. तरी तेच उदक गंगा, यमुना, अशी निरनिराळी नावे स्वीकारून प्रयागाच्या ठिकाणी एकत्र होते व त्या संगमावर लोकांचा उद्धार करते. त्याप्रमाणेच माझ्याशी ऐक्मय झाल्याने भाविक भक्तही मोठय़ा योग्यतेला चढून इतरांचा उद्धार करतात. माझे अनन्य भक्त मला मिळून एकनि÷तेने माझे भजन करतात. अशा भजनाने माझ्याशी ऐक्मय झाल्यामुळे भाविक, सात्त्विक व अत्यंत दीन लोक उद्धरतात. पृथ्वी ही द्रव्याने भरलेलीच आहे पण पायाळूशिवाय मात्र त्या द्रव्याची प्राप्ती होत नाही. त्याप्रमाणे आत्मा हा मूळचा स्वतःसिद्ध आहे पण गुरुकृपा होते तेव्हाच त्याची प्राप्ती होते. जे भक्त चारही पुरुषार्थाना सोडून चारही मुक्तींची उपेक्षा करितात व पांचव्या पुरुषार्थाची भक्ती करतात, ती भक्तीच उद्धवा! मला प्रिय आहे. अशाच भक्तीची मला आवड असते. असेच भक्त माझे लाडके असतात. माझ्याप्रमाणेच निरिच्छ असणाऱया भक्तांचे मला कौतुक वाटते. असे त्यांचे प्रेम गोड. आम्ही प्रेमाचे पाहुणे व भावार्थांचे सेवक आहोत. मी एकनि÷ाची जीवाभावाने सर्वस्वी सेवा करावी. माझे नाव आत्माराम आहे. मी सर्व इच्छा नष्ट झालेला असा आहे. तरी पण मी प्रेमळ भक्तांची इच्छा बाळगतो, इतके त्यांचे प्रेम गोड असते. मग मी प्रेमळ भक्ताला तत्काळ आपल्या बरोबरीला घेतो आणि शेवटी माझेच सुख मी त्याला देतो. कारण मला प्रेमाची फार आवड आहे.
क्रमशः








