अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा आत्मस्वरूपाशी एकरूप झालेल्या साधकाला आत्मस्वरूपाचा विसर पडत नाही. त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाची आठवण मुद्दामहून काढावी लागत नाही. मी, ‘आत्मा स्वानंदकंद । ऐसा अखंडत्वे परमानंद’ तो कायम उपभोगत असतो. सौभाग्याकडे नेणारा ही आत्मस्वरुपाची ओळख निरनिराळ्या उपायांनी होत असते. अधिकारी व्यक्तींनी सांगितलेल्या निजबोधाच्या वर्माचे श्रवण केल्याने हा कुणाला लाभतो तर कुणाला मननाने म्हणजे श्रवण केल्यावर सतत त्याची मनात उजळणी केल्याने लाभतो, कुणी असा निजबोध व्हावा म्हणून सतत त्याचा ध्यासच घेतात, त्यांना निदिध्यासाने त्याची प्राप्ती होते. कुणाला प्रत्यगावृत्तीने हा बोध मनी ठसतो किंवा माझी अद्वैतभक्ती केल्याने मी सगळाच्या सगळा ताब्यात येतो. निजबोध होण्याचे असे अनेक उपाय आहेत. जो उपाय आवडेल त्याने निजबोधाची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून मी मुद्दामहून सर्व उपाय तुला सांगितले. अशाप्रकारे कोणत्या ना कोणत्या उपायांनी निजबोध करून घेणाऱ्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. म्हणजे मी कोण, कसा ह्याची जाणीव त्याला होते. उद्धवाच्या प्रेमापोटी भगवंत त्याला आत्मस्वरूपाचे म्हणजे स्वत:च्या मूळ रूपाचे वर्णन करून सांगत आहेत. भगवंतानी त्या त्या अवतारात करावयाची कामे लक्षात घेऊन त्याला अनुरूप असे सगुण रूप घेतलेले असते. अवतारकार्य संपल्यावर ते रूपही नष्ट होते. म्हणून त्यांचे चिरंतन टिकणारे स्वरूप समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने भगवंत उद्धवाला काय काय सांगत आहेत ते लक्षपूर्वक ऐकुया. भगवंत म्हणाले, उद्धवा मी सृष्टीच्या आधीपासून असून माझ्या अस्तित्वाला अंत नाही म्हणून मला अनंत म्हणतात. मी नित्यमुक्त असतो. ह्या समस्त संसाराच्या निर्मितीला मी मूळ असून माझ्या लीलेने, मला हवी तशी सृष्टीनिर्मिती करत असतो. रजोगुणाच्या माध्यमातून अद्वैतपणे अनेक रूपे धारण करतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर बुद्धिबळातील सोंगट्याचे देता येईल. ज्याप्रमाणे एकाच लाकडापासून राजा, वजीर, पशु, प्यादी तयार होतात त्याप्रमाणे ह्या समस्त सृष्टीतील सर्व सजीवनिर्जीव वस्तूंची निर्मिती मज एकट्यापासून होत असते. माणसाने एखादी गोष्ट तयार केली की, ती त्याने तयार केली असे वाटून त्याला अहंकार होतो किंवा ती गोष्ट त्याने तयार केली म्हणून त्या वस्तूचा उपयोग करणाऱ्याच्यावर उपकार केले असे समजून तो त्यांच्याकडून कसली ना कसली तरी अपेक्षा करत असतो. ह्याउलट सृष्टीतील जीवाना मी तयार केलं म्हणून मला कधीही अहंकार वाटत नसतो किंवा त्यांना तयार करून मी त्यांच्यावर उपकार केले असं समजून त्यांच्याकडून मला कसलीही अपेक्षा नसते. ज्याप्रमाणे निर्जीव असलेल्या बुद्धिबळातील सोंगट्या एकमेकांशी तुंबळ युद्ध करतात. त्याप्रमाणे आपणच जणू काही सर्व शक्तिमान आहोत असे समजून माणसे एकमेकांशी युद्ध करत असतात. अशावेळी माझीच निर्मिती असलेल्या निष्पाप लोकांच्या रक्षणाचा मला विलक्षण कळवळा येतो कारण मी सृष्टिचे पालन करत असतो. मुळात प्रकृती निर्जीव असल्याने तिला स्वत:च्या बळावर कोणतीही हालचाल करता येत नाही. तिला पुरुषरूपी चैतन्य प्राप्त झाले की मग तिच्यात हालचाल सुरू होते. तसेच काळाचे रूप घेऊन मीच तिचा संहारही करतो. म्हणजेच सृष्टीची निर्मिती करणारा, पालन करणारा आणि तिचा संहार करणारा मीच आहे. अचेतन असलेल्यात झुंज लाऊन देणारा, न मरणाऱ्याला मारणारा, एकाला जिंकवणारा तर दुसऱ्याला हरवणारा अशा पध्दतीने दोन्ही पक्षांना खेळवणारा मीच आहे. माणसाचं अस्तित्व संपलं की पुण्यात्मा वैकुंठाला जातो, दुष्टात्मा नरकात पडतो ह्याप्रकारे सृष्टीमध्ये बंधमोक्ष सुरु असतो.
क्रमश:








