अध्याय अठ्ठाविसावा
माणसाला विकारांची बाधा का होत असावी? ह्यावर सविस्तर माहिती देताना भगवंत म्हणाले, माणसाला वस्तूमुळे प्रेम, द्वेष आणि त्याचा परिणाम म्हणून अनुक्रमे सुख दु:ख असे विकार जडतात असे वाटण्याची शक्यता आहे पण कोणतीही वस्तू मनुष्य विकारी व्हायला कारणीभूत नसते कारण वस्तू निर्जीव असल्याने माणसाला मोहात पडण्याचे सामर्थ्य तिच्यात नसते. माणसाला पूर्वकर्मानुसार अतर्क्य असा प्रपंच प्राप्त होतो. तो त्रिगुणयुक्त असल्याने ज्या गुणाचे प्रभुत्व असते त्यानुसार, त्याला तो अनेकरूपी भासतो. नाम, रूप, व्यक्ति, वर्ण, कुळ, गोत्र, क्रियाचरण अशी प्रपंचाची अनेक रूपे त्याला भासतात. माणसाला ते सर्व सत्य वाटते. माणसाचे चित्त प्रपंचातल्या वस्तूच्या ठिकाणी गुंतलेले असते. त्यामुळे ती वस्तू आपल्याला अनुकूल आहे असेच त्याला वाटते. जग आहे तसे न दिसता वेगळेच वाटणे ही जगाची नसून जगाशी एकरूप झाल्यामुळे स्वत:ला कर्ता समजणाऱ्या आत्म्याची करामत असते. माणसाचा आत्मा हा विकारी असतो. त्यामुळे अज्ञानी मनुष्य अविचाराने वागतो. त्या अज्ञानाची निवृत्ती झाली की, साधकाला माझी सहजी प्राप्ती होते. अज्ञानाची निवृत्ती होऊन आत्मज्ञानाचा उदय माणसाच्या चित्तात व्हावा म्हणून माझी भक्ती करण्याची आवश्यकता आहे म्हणून तिचे स्वरूप मी सविस्तर सांगितले. भक्तांनी स्वत:चा स्वार्थ साधून घेऊन स्वत:चे आत्यंतिक क्षेम म्हणजे कल्याण करून घ्यावे म्हणून माझ्या बोलण्याचा गुह्यार्थ लक्षात घे. तो म्हणजे सर्वभूती मी वास करून असतो. हे सदैव लक्षात ठेऊन जे भक्तिभावाने माझे भजन करत असतात त्यांचे मी तू पण मावळते. सर्वत्र जर मीच भरून राहिलो आहे तर मी आणि तू हे दोन वेगवेगळे आहेत असे समजणे हेच अज्ञान आहे. जी गोष्ट मिथ्या असते तीच अविद्येला किंवा अज्ञानाला कारण असते. दृश्य-द्रष्टा-दर्शन म्हणजे समोर दिसणारे दृश्य, ते पाहणारी व्यक्ती आणि त्याला त्याच्या इच्छेनुसार निघणारा त्या दृश्याचा अर्थ ह्यासगळ्याला त्रिगुण कारणीभूत असतात. भगवंतांच्या बोलण्यावरून चटकन लक्षात येते की, मृगजळ हरणाला असेच भुलवत असते. उन्हाळ्यात भर दुपारी तहानेने व्याकूळ झालेले हरीण समोर दिसणाऱ्या मृगजळात पाणी आहे असे समजते. पाणी पिण्याच्या मोहाने ते त्या दिशेने पळत सुटते. ते जसजसे पुढे जाते तसतसे ते मृगजळही पुढे पुढे सरकत असते. त्याप्रमाणे माणसालाही समोरची वस्तू त्याला अनुकूल आहे असा भाव होत असतो आणि ती मिळवण्यासाठी तो जीवाचा आटापिटा करून त्यापाठी पळत सुटतो. मोह, लोभ, राग आणि द्वेष हे सर्व त्रिगुणांचेच खेळ असतात. त्यामुळेच माणूस विकारवंत होतो. ज्याने ह्या त्रिगुणांवर मात केलेली आहे त्याला प्रपंचाचे भान राहिलेले नसल्याने तो परिपूर्ण ब्रह्म झालेला असतो. अशा माणसाच्या लेखी सर्व काही ईश्वररूप असल्याने, समोर दिसणाऱ्या व्यक्तीचे नाम, रूप, गुण इत्यादि सर्व नाहीसे होऊन त्याला सर्वत्र चैतन्यपूर्ण परब्रह्माची उपस्थिती जाणवत असते. त्या परब्रह्माचे वैशिष्ठ्या असे की, ना ते उंच असते, ना ठेंगणे, ना जाड असते, ना बारकूळे, ना वाकडे असते, ना विकारी, इथे ना काही गरम असते, ना काही थंड, ना काही कठीण असते, ना काही मृदू, ना काही कडू असते, ना काही गोड, सर्व गोष्टी, व्यक्तीना सुखदु:खाची बाधा झालेली नसते. त्यामुळे त्या वेगवेगळ्या भासतच नाहीत. सर्वकाही एकसारखे. अशा परब्रह्माची सर्वत्र असलेली उपस्थिती ज्याला जाणवते त्याचे मी तू पण पूर्णपणे मावळलेले असते. गीतेच्या चौदाव्या अध्यायात गुणातीत म्हणजे गुणांना ओलांडून पलीकडे गेलेला माणूस कसा असतो ह्याचे भगवंतानी केलेले वर्णन असे आहे,
राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे। त्यांचा चि खेळ जाणूनि न डोले लेश-मात्र हि । 23। आत्मत्वे सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका । धैर्यवंत सुखे दु:खे स्तुति-निंदा प्रियाप्रिय । 24 । मानापमान जो नेणे नेणे जो शत्रु-मित्र हि । आरंभ सोडिले ज्याने तो गुणातीत बोलिला । 25 ।
क्रमश:








