ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना परळीत उधाण आलं होतं. मात्र, खुद्द धनंजय मुंडे यांनीच यासंदर्भात खुलासा करत यासंदर्भातील चर्चांवर पडदा टाकला.
मुंडे म्हणाले, बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या ठिकाणी राष्ट्रवादीने तगडा उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अमरसिंह पंडित यांच्यासह माझे नाव चर्चेत आहे. पण पक्षाने माझ्यासोबत यासंदर्भात कोणतीही चर्चा केली नाही. माझ्यासाठी दिल्ली अजून दूरच आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी लायकी नाही. मी अजून लहान आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नाही.
या मतदारसंघातून 1999 ते 2004 दरम्यान राष्ट्रवादीचे जयसिंगराव गायकवाड निवडून आले होते. 2009 पासून या मतदारसंघात भाजपची पकड आहे. पण यावेळी बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.








