कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांचे उद्गार
पणजी : भारतीय जनता पक्ष हा जनतेच्या कामांना अधिक महत्त्व देतो. त्यामुळे पक्षाचा प्रत्येक घटक हा तळागाळापर्यंत पक्षाचे कार्य कसे वाढीस लागेल, याकडेच अधिक लक्ष देत आहे. भाजपचा आपण वरिष्ठ नेता आहे. पक्षाने आपल्यावर पूर्ण विश्वास टाकल्याने आपण सभापतीपद सोडून मंत्रिपद स्वीकारले. परंतु या पदावर आपण समाधानी नसल्याचे काही माध्यमांनी सांगून खोटे वृत्त पसरवले. आपण कधीच असमाधानी राहत नाही, प्रत्येक जबाबदारी समाधानाने स्वीकारत आलो आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिली.
पर्वरी येथील सचिवालयात काल गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तवडकर यांनी पक्षाचे कार्य आणि आपली जबाबदारी यावर भाष्य केले. ते म्हणाले, आपण बंगळूर या ठिकाणी दौऱ्यावर असताना आपल्या नाराजीबाबत आणि राजीनामा देण्याच्या तयारीबाबत काहींनी खोटे व दिशाभूल करणारे वृत्त पसरवले. यामध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे तवडकर यांनी सांगितले. माध्यमांनी चुकीचे वृत्त पसरवल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परंतु तवडकर यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगून सर्व दिशाभूल करणाऱ्या वृत्ताच्या चर्चेला पूर्णपणे विराम दिला आहे.
सर्व खाती लोकोपयोगी : तवडकर
येत्या 2027 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील व केंद्रातील पक्ष नेतृत्वाने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने आपल्याला मंत्रिपदे दिली. आपणाला जी खाती मिळाली आहेत, ती लोकोपयोगी असल्याने या खात्यांचा फायदा सामान्य जनतेला कसा देता येईल, हे आपले प्रमुख लक्ष्य आहे, असे मंत्री तवडकर यांनी सांगितले.









