नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपण मला जर अप्रामाणिक मानत असाल, तर या जगात कोणीच प्रामाणिक नाही असे म्हणावे लागेल, असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीच्या मद्यविक्री धोरण घोटाळय़ात त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यांना तसे समन्स सीबीआयने दिले आहे. ही चौकशी आज रविवारी होणार आहे. त्यानंतर कदाचित त्यांना अटक केली जाईल, अशी चर्चा आहे.
सीबीआय, ईडी आदी केंद्रीय तपास संस्थांनी उच्छाद मांडला आहे. त्यांनी आमच्या दोन मंत्र्यांना अटक केली. त्यांना अटक करुन त्यांना माझा गळा पकडता येईल, अशी त्यांची समजूत आहे. हे केंद्र सरकारचे कारस्थान असून आम्हाला जबरदस्तीने घोटाळय़ांमध्ये अडकविण्याचा हा प्रयत्न आहे. हा आमच्यावर अन्याय असल्याचे प्रतिपादन अरविंद केजरीवाल यांनी येथे शनिवारी केले.
सिसोदिया यांचे 14 मोबाईल
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडे 14 मोबाईल फोन्स असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सिसोदिया मद्य धोरण घोटाळय़ांमध्ये या फोन्सचा उपयोग करीत होते, असा आरोप आहे. केजरीवाल यांनी हे आरोप नाकारले आहेत. मनिष सिसोदिया यांना धमकी देऊन आणि त्यांचा छळ करुन त्यांच्याकडून आपले नाव वदवून घेण्याचा प्रयत्न ईडी आणि सीबीआय करीत आहेत, असा आरोपही केजरीवाल यांनी केला. दिल्ली सरकार ईडी आणि सीबीआय अधिकाऱयांविरोधात अभियोग सादर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मद्य धोरण घोटाळय़ात ज्या आरोपींना पकडण्यात आले आहे, त्यांच्याकडूनही दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी नावे वदवून घेण्याचा प्रयत्न चालला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला असून याचा परिणाम गंभीर होऊ शकतो, अशी धमकीही त्यांनी केंद्र सरकारला देण्याचा प्रयत्न केला.









