आई मैं तो आई नजारों के अनजाने
इक जहाँ से..
लाई मैं तो लाई बहारों के अफसाने
भी वहाँ से..
ना ना मुझे छूना ना दूर ही रखना
परी हूँ मैं..
नव्वदच्या दशकातील प्रचंड म्हणजे प्रचंड गाजलेलं गाणं.. सुनीता राव या तत्कालीन अत्यंत लोकप्रिय झालेल्या पॉप सिंगरच्या स्वरातलं खूप गाजलेलं गाणं आहे हे. या गाण्याने ती पॉप गायिका म्हणून प्रसिद्ध झाली. आणि मग पुढे तिच्या करिअरचा चढता आलेख सुरू झाला. पऱ्यांची पावलं जमिनीला टेकत नाहीत म्हणे. त्या आपल्या नाजुक पंखांनी स्वप्नांच्या आकाशात विहार करतात. फार देखण्या असतात. या आणि त्या अशा दोन्ही जगांना जोडतात. असंच जोडण्याचं काम सुनीता रावने केलंय. भारतीय सर्वसाधारण जनता आणि पॉप संगीत यांचा काही संबंध नव्हता तोपर्यंत. म्हणजे पॉप नव्हतं असं नव्हे, उषा उत्थूपसारख्या ग्रेट मंडळींनी ते यापूर्वीच आणलं होतं पण त्या संगीताची पावलं जमिनीला लागली ती या गाण्याने. तोपर्यंत ते संगीतही परीसारखंच होतं आपल्यासाठी. अतिउच्चभ्रू लोकांच्या क्लबच्या बाहेर कधी आलंच नव्हतं. पण परी हूँ मैं रिलीज झालं आणि त्याने भूतो न भविष्यती असा सनसनाटी माहोल केला. हा माहोल यूट्यूब वगैरे बाळं जन्मालाच काय पण कल्पनेतही यायच्या खूप आधी झाला आहे हे लक्षात घ्या. त्यावेळी धुआँ या अल्बमच्या तब्बल पंचाहत्तर हजारांहून जास्त कॅसेट्स खपल्या होत्या. एकेका गाण्याचं नशीब असतं तसं या गाण्याचं नशीब एवढं चांगलं, की तेव्हा तर ते गाजलंच, पण त्यानंतरही आजपर्यंत गरब्यासाठी असणारं एक सुंदर गीत म्हणून ते आजपर्यंत तितकंच लोकप्रिय आहे. मग त्याचं रीमिक्स झालं, सगळं काही झालं पण त्या गाण्याची मोहिनी काही कमी झाली नाही आहे. त्या गीताकडे पाहिलं की लक्षात येतं की अरेच्चा…हे गाणं परीसारखंच आहे की! कोण असतात या पऱ्या?
परी परी है इक परी
आसमाँ से आ गिरी
सामने मेरे खड़ी
मुझे उससे प्यार हो गया
हंगामामधलं बाबुल सुप्रियोच्या स्वरातलं हे गीत.. अतिशय म्हणजे अतिशय श्रवणीय. प्रेमात पडलेल्या नवयुवकाची पावलं कुठे जमिनीला टेकतात? ‘आजकल पाँव जमीं पे नहीं पडते मेरे’ अशीच अवस्था असते त्याची. म्हणून स्वत:च्या प्रेमिकेचं वर्णन अशा शब्दांत करतो तो. पऱ्यांसारखेच स्वप्नांनाही पंख असतात ना? कल्पनेचं जग मोठं गोड असतं. फक्त लहानपणीच्या स्वप्नांत परीराणी येऊन खेळवते आणि मोठेपणीच्या स्वप्नात परीच राणी होऊन येते आणि मोहिनी घालते. ग्रिमच्या परीकथा खूप प्रसिद्ध आहेत. आमच्या पिढीचं बालपण अशाच कथा वाचून सरलं. आजही ती पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. त्यातली ती पर्वतराजीत वसलेली युरोपियन खेड्यातली सुंदर घरं. त्यातली ती गोरीपान माणसं आणि त्यांना भेटणाऱ्या त्यांच्याशी बोलणाऱ्या पऱ्या! त्यांना म्हणे वरदान असतं चिरतारुण्याचं. त्यांची परीनगरी असते. चांगल्या गुणी मुलांना त्या दिसतात. वेगवेगळी रूपं घेतात. जख्ख म्हातारी, भिकारीण अशी रूपं घेऊन त्या मुलांशी बोलतात. त्यांची मदत मागतात. कदाचित देशाचे भावी नागरिक माणुसकी, दया, क्षमा, करुणा यासारखी मूल्य शिकत आहेत की नाही हे त्या तपासत असाव्यात. मग त्या कथेतली काही मुलं दुष्ट असतात तर काही चांगली. मग दुष्ट मुलांना परी चांगलाच धडा शिकवते, तर चांगल्या मुलांना वर देते. काय सुंदर कथा असत.. तेव्हा मनात कोरलेली परीची प्रतिमा अजूनही तशीच आहे. असं वाटतं की रोजच्या व्यापातून थोडावेळ काढून त्या पऱ्यांच्या राज्यात जावं आणि मज्जा करून यावं. पण मोठेपण हे ही कल्पनारम्य सृष्टी गाडून तिच्या थडग्यावरच बांधलेलं असतं. मग पऱ्या कुठून दिसायला? त्यासाठीची दृष्टी मोठेपणी राहतच नाही.
गोऱ्यापान रंगाची, निळ्या निळ्या डोळ्यांची, फुलपाखरी बांध्याची आणि तसेच पंख लावून उडणारी, कायमची वय चौदाची अशी परी कित्येकांच्या स्वप्नात येते आणि मनातच वस्तीला उतरते. औरंगाबादजवळ धुळे रोडला खरोखरीचा परियों का तालाब आहे. काहींच्या मते तिथली इमारत म्हणजे राममंदिरासारखंच जुनं शिवमंदिर आहे. शिवपार्वतीच्या आकाशमार्गे भ्रमणाच्या कथाही आपण खूप ऐकतो. यामध्ये काही समान संकल्पना प्रत्येक समाजात असतात का असं वाटतं. पण एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे आपल्याला कल्पनासृष्टीत वावरायला आवडत असतं. म्हणून आपल्याला परी या संकल्पनेचा सोस असतो, कौतुक असतं. म्हणून आपल्या लाडक्या लेकीला तिचे बाबा परी म्हणून संबोधतात. पापा की परी हा गंमतीचा विषय झाला असला तरी मुळात तो आत्यंतिक प्रेमापोटी निपजलेला विषय आहे एवढं नक्की. ‘कभी कभी’ या मल्टिस्टारर जुन्या क्लासिक सिनेमात वहिदा रेहमानच्या तोंडी एक सुंदर गीत आहे.
मेरे घर आई एक नन्ही परी
चाँदनी के हसीन रथ पे सवार
अमिताभ, नीतू सिंग, सिमी गरेवाल आणि प्रेमानं गाणं गुणगुणणारी वहिदा. परीचं कौतुक आणि कौतुकाची परी म्हणजे काय ते त्या गाण्यात पहावं. तो सिनेमाही क्लासिक आहे. संपूर्ण सिनेमा पाहताना हलू नये असं वाटतं. आणि प्रत्येक गाणं सर्वांगसुंदर आहे. हे एक गाणं त्यातलंच. गाण्यातल्या त्या दोघी अगदी पऱ्याच वाटतात. म्हणजे परी फक्त तरुणांनाच हवीहवीशी वाटते असं नाही. आपल्या घरी छोटीशी परी यावी हे कित्येक विवाहितांचं स्वप्न असतं. तशी ती आली की तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होतं. आधीच धाव धाव धावणारा बाबा मग परीच्या भविष्यासाठी आणखीनच धावायला लागतो. सकाळी लवकर तो कामावर जातो तेव्हा ती झोपलेली असते आणि रात्री उशिरा येतो तेव्हा,
कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच तुला घेतो आज मी कुशीत
निजतच तरी पण येशील खुशीत
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
परीची आणि बाबाची भेट जागेपणी घडतच नाही. अगतिक होऊन बाबा प्रश्न विचारतो
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?
सासुऱ्याला जाता जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येइल का पाणी डोळ्यामध्ये?
आणि मग एक आकांत आतल्या आत सुरू होतो. परी अशी का सुटते हातातून? आपण परीजवळ का नाही जाऊ शकत? पऱ्या आपल्या जगातून निघून का जातात? आणि मग या प्रश्नाचं उत्तर मिळतं. पऱ्यांचं जगच वेगळं असतं. मोठ्या माणसांच्या जगातून परी हरवते. आणि परीचं लग्न झालं की?…..परी स्वत:च्या जगातूनही हरवते. आणि शिल्लक राहते फक्त कधीतरी गरबा खेळताना परी हूँ मैं म्हणण्यापुरतीच….
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








