अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, जो माझ्याशी अनन्य झालेला असतो, त्याच्या ठिकाणी मी वस्तीला असतो. अनन्य भक्ताच्या वाट्याला विघ्ने जात आहेत असे मला दिसले रे दिसले की, त्याने बोलावण्याची वाटसुद्धा न पाहता मी तेथे उडी घालतो. अरे, यात विशेष असे काही नाही कारण ती माझी लाडकी बाळे असतात. ती माझी लाडकी बाळे कशी होतात असे विचारशील तर, ज्याप्रमाणे लहान बाळाला फक्त आणि फक्त आईच हवी असते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांना केवळ मी आणि मीच हवा असतो. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा मला साकडे घालतात. त्या त्या वेळी त्यांना होणारा त्रास मी स्वत: सोसतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना कसलीही झळ बसू देत नाही.
राजाने प्रल्हादाला शासन करायचे ठरवल्यावर मी त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटावेळी त्याचे रक्षण केले. थोर भक्त अंबरीश राजावर संकट येतंय असं दिसल्याबरोबर मी महान ऋषी दुर्वासांचा अपमान करायला मागेपुढे बघितले नाही. दुर्वास मुनींनी अंबरीश राजाला दिलेला शाप मी माझ्यावर घेतला. शापानुसार राजाला दहा गर्भवास भोगावे लागणार होते ते सर्व मी सोसले.
माझ्या भक्ताला मी कोणत्याही प्रकारचा उणेपणा येऊ देत नाही. गजेंद्र संकटात सापडला असताना मी हातात सुदर्शन चक्र घेऊन त्याच्यापाशी गेलो आणि निमिषार्धात त्याचा पाय मगरीच्या मिठीतून सोडवला. द्रौपदीवर निर्वस्त्र होण्याचे संकट येताच तिने माझा धावा केला आणि मी क्षणार्धात तेथे धाव घेऊन तिला वस्त्रs पुरवली. गोपालाना दावाग्नीने गिळायला सुरवात केल्याबरोबर त्या दावाग्निला मी स्वत:च गिळून टाकले. अशा प्रकारे सदासर्वकाळ मला भक्तांचा कळवळा येत असतो. द्रोणाचार्यांनी सोडलेल्या अस्त्रामुळे गर्भात असणारा अभिमन्यूचा मुलगा परीक्षित मृत होणार होता पण हे ओळखून मी त्याचे रक्षण केले. अर्जुनाला तर मी किती वेळा मदत केली त्याला गणतीच नाही. त्यातील मुख्य म्हणजे त्याची जयद्रथ वधाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी आणि त्याला अग्निकाष्ट भक्षण करण्यापासून वाचवावे ह्या उद्देशाने मी माझ्या सुदर्शनचक्राने सूर्याला झाकून टाकले. महाभारतातल्या युद्धाच्यावेळी मी हातात कोणतेही शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती पण युद्धात एकवेळ अशी आली की, माझ्या प्रिय अर्जुनाला वाचवण्यासाठी, मला माझी प्रतिज्ञा मोडायला लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यादिवशी दुर्योधनाने भीष्माना डिवचले होते. तो त्यांना म्हणाला, आमच्यापेक्षा तुमचे पांडवांवर जास्त प्रेम आहे म्हणून तुम्ही त्यांच्याशी प्राणपणाने लढत नाही.
दुर्योधनाचे बोल ऐकून भीष्माना अतिशय त्वेष आला आणि ते घनघोर तपश्चर्येने कमावलेल्या दिव्यास्त्रांचा प्रयोग पांडवांच्या सेनेवर करू लागले. त्यादिवशी त्यांनी पांडव सेनेची अत्यंत हानी केली. अर्जुन सोडून इतर पांडव निष्प्रभ झाले. आजच पांडवांचा पराभव होतो की काय असे वाटू लागले. युद्धात उतरण्यासाठी माझी चुळबुळ सुरु झाली. कारण मी गीतेत सांगितल्याप्रमाणे
गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना । अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे।4.7 । राखावया जगी संता दुष्टा दूर करावया। स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी । 4.8 । असे असताना माझ्यासमोर सरळसरळ कोणत्याही परिस्थितीत नितीन्यायाने वागणाऱ्या चांगल्या स्वभावाच्या पांडवांचा होणारा पराभव आणि तो सुद्धा सदैव दुष्टबुद्धीने वागणाऱ्या कौरवांकडून होत आहे हे पाहिल्यावर मला माझी प्रतिज्ञा मोडून शस्त्र हाती घ्यावे लागले तरी बेहत्तर, असा विचार करून मी रथाच्या खाली येऊन लढायला सज्ज झालो परंतु मला अत्यंत प्रिय असलेल्या अर्जुनाने सावध केले आणि प्रतिज्ञा मोडू नकोस असे विनवले.
म्हणून माझी प्रतिज्ञा मोडता मोडता राहिली. सांगायचे तात्पर्य असे की, भक्तावर आलेले संकट दूर करण्यासाठी माझ्यावर माझी प्रतिज्ञा मोडायची वेळ आली तरी त्याची फिकीर करत नाही.
क्रमश:








