नवी दिल्ली :
ह्युंडाई मोटर इंडिया यांनी जनरल मोटर्ससोबत एक करार केला असून या करारान्वये उत्पादन कारखाना घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जनरल मोटर्सच्या तळेगाव येथील उत्पादन कारखान्याचे अधिग्रहण कराराअंतर्गत ह्युंडाई करणार आहे, अशी माहिती आहे. याअंतर्गत जागा, इमारत, मशिनरी व उत्पादन साहित्य असे तळेगावमध्ये ह्युंडाई ताब्यात घेणार आहे. दक्षिण कोरीयन कंपनीने सदरच्या करारासाठी किती रक्कम मोजली आहे याचा खुलासा केलेला नाही.
सदरच्या अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या कारखान्याची उत्पादन क्षमता 1 लाख 30 हजार इतकी आहे. अलीकडेच ह्युंडाईने आपल्या श्रीपेरंबुदूरमधील कारखान्यातील उत्पादन क्षमता 7 लाख 50 हजारवरुन 8 लाख 20 हजार इतकी वाढवली आहे. आगामी कार उत्पादनक्षमता वार्षिक स्तरावर 10 लाखापर्यंत नेण्याचा कंपनीचा इरादा आहे.
काय म्हणाले सीईओ
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उन्सू कीम यांनी सांगितले की कंपनी तळेगाव, पुणे येथे आधुनिक निर्मिती केंद्र मेड इन इंडिया कारसाठी सुरु करणार आहे. तळेगावात कारचे उत्पादन 2025 पासून सुरु होणार असल्याचे कीम यांनी म्हटले आहे. ह्युंडाई ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी गणली जाते.









