चेन्नई :
ऑटो क्षेत्रातील कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया आगामी काळात देशात इलेक्ट्रीक कार्सप्रती वाढती लोकप्रियता पाहता चार्जिंग केंद्रांची संख्या वाढवण्याची योजना बनवत आहे.
पुढील 7 वर्षाच्या अवधीत टप्प्याने देशभरात विविध शहरात एकंदर 600 फास्ट चार्जिंग केंद्रे स्थापन करण्याचा विचार कंपनीने चालवला आहे. यामध्ये महत्त्वाचे महामार्ग आणि त्यासोबतच्या मोठ्या शहरांमध्ये अधिक करुन जास्तीत जास्त चार्जिंग केंद्रे स्थापण्याचा इरादा कंपनीचा आहे. पुढील काही महिन्यात कंपनीची इलेक्ट्रीक कार क्रेटा इव्ही लाँच केली जाणार आहे. सध्याला कंपनीची आयओनिक 5 ही इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध आहे. जिची किंमत 46 लाखाच्या घरात आहे.
महिनाअखेरपर्यंत किती केंद्रे स्थापणार
यामहिन्याअखेरीस कंपनीची फास्ट चार्जिंग केंद्रांची संख्या 50 वर पोहचणार आहे. ही केंद्रे सर्व कंपन्यांना आपल्या इलेक्ट्रीक कार्स चार्ज करण्याची परवानगी देतील. नवी स्थापली जाणारी ही केंद्रे कॉफी केंद्रे, रेस्टॉरंट व शॉपिंग केंद्रांच्या आसपास स्थापली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









