कोल्हापूर :
‘हायपर टेन्शन’ हा आजार ऐकण्यास साधा वाटत असला तरी हा हायब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचाच आजार आहे. याला धमनी उच्च रक्तदाब देखील म्हंटले जात असुन तज्ञांच्यामते याला ‘साइलेंट किलर’ म्हणूनही ओळखले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूवर येणारा अति तणाव व धावपळ असल्याचे तज्ञ सांगतात. रक्तदाबाचा धोका उद्भवल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार व जीवनशैलीत बदल करणे आवश्यक बनले आहे.
पुर्वी उच्च रक्तदाबासह मधुमेह, हृदयविकारचे आजार वयाच्या 50 ते 60 वर्षाच्यापुढे होत असत. आता विशीपासूनच उच्च रक्तदाबाचे विकार उद्भवण्यास सुरूवात होत आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन दशकात भारतासह जगभरात ही स्थिती वेगानं बदलली आहे. बदलती जीवनशैली, आहारातील अनियमितता, मीठाचा अधिक वापर, स्पर्धेच्या युगात वाढलेला तणाव, लठ्ठपणा, झोपेचा अभाव, अधिक राग, तेलकट पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन आदी कारणांमुळे वयाच्या वीशी व तीशीतच हायपर टेन्शन सारखा आजार डोके वर काढू लागला आहे.
तरूणाईत हायपर टेन्शनचे वाढते प्रमाण चिंतजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. अगदी तरूण वयातच हायपर टेन्शनमुळे हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोकाही वाढू लागला आहे. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ल्याने आहारात सुधारणा करणे महत्वाचे आहे. भरपूर मीठ असलेल्या पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा त्रास होतो त्यामुळे किडनीवरही परिणाम होतो.
पुरूषांपेक्षा महिलांचा टक्का अधिक
उच्च रक्तदाबाच्या विकारामध्ये पुरूषांपेक्षा महिलांचा टक्का अधिक असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात महिलांचे प्रमाण 32.2 टक्के आहे. तर पुरूषांचे प्रमाण 25.1 टक्के आहे. राज्यात महिलांचे प्रमाण पुरूषांच्या समान आहे. राज्यात महिला 23.1 टक्के तर पुरूषांचे 24.5 टक्के प्रमाण आहे. घरातील जबाबदारी पार पाडत असताना महिलांना पुरूषांपेक्षा अधिक मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याने तज्ञ सांगतात. त्यामुळे महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
उच्च रक्तदाबाची लक्षणे
डोकेदुखी, चक्कर येणे, पायाला सुज येणे, थकल्यासारखे वाटणे, सुस्ती येणे, निद्रानाश, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे, वेगवान श्वास घेणे किंवा श्वास घेण्यात त्रास होणे, नजर धूसर होणे, चलताना, जीणा चढताना दम लागणे, घाम येणे आदी लक्षणे आहेत. रक्तदाबाची तपासणी करून डॉक्टरांकडून उपचार व आहाराविषयी मार्गदर्शन घेणे हा एकमेव मार्ग आहे.
उच्च रक्तदाबाची कारणे :
मानसिक ताण–तणाव, लठ्ठपणा, धुम्रपान, तंबाखू, मद्याचे अतिसेवन, आहारात मिठाचे प्रमाण जास्त, अनियंत्रित आहार, अनुवंशिकता
नियंत्रणासाठी आहार : स्किम्ड दूध, पालक भाजी, न खारवलेल्या सुर्यफुलाच्या बिया, द्विदल मान्य, सोयाबीन, केळी, डार्क चॉकलेट, बटाटा
असे करा व्यवस्थापन : योग्य आहार, नियमित तपासणी, व्यायाम व तणावमुक्त, औषधोपचार, जगरूकता, नियमित शारीरीक हालचाली,
उच्च रक्तदाबाची धोके
शरीरातील रक्तवाहिन्यांवर सतत ताण येते.
हृदय, मेंदू, मूत्रपिंड, डोळ्यांवर परिणाम होतो.
हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हृदय बंद पडू शकते.
किडनीचे आजार किंवा किडनीचं काम बंद पडू शकते.
डोळ्यांच्या रेटिनामधील रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे दृष्टी जाऊ शकते.
पोटाचे विकार, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉलकडे वाटचाल
असे ठेवा हायपर टेन्शनला दुर
जंक फुड, मीठाच्या पाकिटबंद पदार्थांचे सेवण टाळणे
आयोडाइज्ड मीठ वापर
सॉस, केचप, खारी बिस्किटं, चिप्स, चिज, खारे मासे यांचं प्रमाण कमी
भाज्या व फळांतून आहार
निखट, तेलकट, तळलेले, गोड, खारट, बेकरीतले पदार्थ टाळा.
नियमित योगा, व्यायाम, योग्य आहार घेणे
ताण–तणाव कमी करणे
आवडते संगीत ऐकणे
तणावमूक्तीसह आहार व जीवनशैलीत बदल आवश्यक
उच्च रक्तदाबापासून दूर राहण्यासाठी तणावमूक्तीसह आहार व जीवनशैलीत बदल केला पाहीजे. आहारामध्ये तेलकट, मसालेदार व अति मिठाचे पदार्थ टाळावेत. तणावमूक्तीसाठी रोज योगा, ध्यानधारना, व्यायाम व आवडता छंद जोपासणे. उच्च रक्तदाबाचे महिलांमध्ये प्रमाण वाढत आहे. महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.
डॉ. अक्षय बाफना, हृदय विकार तज्ञ, सीपीआर हॉस्पिटल








