देशातील परिवहनाचे बदलणार चित्र : रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ
वृत्तसंस्था/ चेन्नई
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भारताच्या पहिल्या हायपरलूप टेस्ट ट्रॅकचा आहे. जलद परिवहनासाठी हे भारताचे अत्यंत मोठे पाऊल ठरू शकते. 410 मीटर लांब हायपरलूप टेस्ट ट्रॅक आयआयटी मद्रासच्या परिसरात तयार करण्यात आला आहे.
हा हायपरलूप टेस्ट ट्रॅक भारतीय रेल्वे, आयआयटी मद्रासची आविष्कार हायपरलूप टीम आणि आयआयटी मद्रासचा स्टार्टअप टीयूटीयू हायपरलूपचा संयुक्त प्रकल्प आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करत त्यासंबंधी माहिती दिली आहे. हा भारताचा पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक आहे. आयआयटी मद्रासच्या थईगुर येथील डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये हा टेस्ट ट्रॅक 410 मीटर लांबीचा आहे. या टेस्ट ट्रॅकवर 100 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने रेल्वे धावू शकते. आता लांब टॅकवर 600 किलोमीटर प्रतितासाच्या वेगावर हायपरलूपचे परीक्षण केले जाणार असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले आहे.
हायपरलूप ट्रेन तंत्रज्ञान
हायपरलूप एक हायस्पीड ट्रेन असून जी ट्यूबमध्ये व्हॅक्यूममध्ये (पोकळी) धावते. हे तंत्रज्ञान एलॉन मस्क यांच्याकडून प्रस्तावित आहे. हायपरलूप रेल्वेचा कमाल वेग एक हजार किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. सर्वकाही सुरळीत राहिले आणि भारतात हायपरलूप ट्रेन सेवेला सुरुवात झाली तर देशातील परिवहन क्षेत्राचे स्वरुपच बदलून जाणार आहे. परंतु सध्या हे तंत्रज्ञान नवे असून यात बरीच सुधारणा व्हायची आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या आर्थिक व्यवहार्यतेचे देखील अध्ययन केले जात आहे.









