नगरसेवक साळुंखेंनी केली भिंतीची रंगरंगोटी
बेळगाव : शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र महापालिका कार्यालयातील भिंतीच गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगीबेरंगी झाल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक रवी साळुंखे यांनी सोमवारी काही ठिकाणी रंगरंगोटी करून भिंती स्वच्छ केल्या. याची माहिती महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटींना मिळताच तातडीने तेथे दाखल झाले. मात्र स्वच्छतेची जबाबदारी तुमची एकट्याचीच नाही असे सांगून रवी साळुंखे यांनी भिंतींची स्वच्छता पूर्ण केली. महापालिका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम खाते, महसूल खाते यासह इतर विभाग कार्यरत आहेत. त्याठिकाणी अधिकारी ये-जा करत असतात. मात्र ये-जा करणाऱ्यासाठी असलेल्या जिन्यावरच गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत होते. बऱ्याच दिवसांपासून येथे सतत थुंकण्याचे प्रकार सुरुच होते. याची दखल घेऊन नगरसेवक रवी साळुंखे यांनी स्वत: रंग आणून सोमवारी त्या ठिकाणी रंगरंगोटी केली. तसेच यावेळी महापालिका आयुक्तांना यापुढे या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी एका माणसाची नेमणूक करावी. महापालिकेमधील अधिकारी किंवा कर्मचारी गुटखा खात असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.









