आयपीएल 2025 : केकेआरचा 80 धावांनी दणदणीत विजय : रघुवंशी, अय्यरची अर्धशतके : सामनावीर वैभव अरोरा, वरुण चक्रवर्तीचे प्रत्येकी तीन बळी
वृत्तसंस्था/कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्सच्या मैदानावर पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. केकेआरने हैदराबादवर 80 धावांनी सर्वात मोठा विजय मिळवला आहे. हैदराबादचा आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. केकेआरने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ अवघ्या 120 धावांवर 16.4 षटकांत सर्वबाद झाला. विशेष म्हणजे, कोलकाताचा चार सामन्यांमध्ये हा दुसरा विजय आहे. तर हैदराबादने सलग तिसरा सामना गमावत पराभवाची हॅटट्रिक साधली आहे.
हैदराबादचा संघ 201 धावांचा पाठलाग करण्यासाठी आला खरा, पण केकेआरच्याने त्यांना एकामागून एक तीन धक्के दिले. त्यामुळे हैदराबादची अवस्था 3 बाद 9 अशी झाली होती. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना स्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेड 4 धावा काढून बाद झाला तर इशान किशन व अभिषेक शर्माही स्वस्तात माघारी परतले. यानंतर नितीश कुमार रे•ाrने 19, कमिंदू मेंडिसने 27 धावांचे योगदान दिले. हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक 33 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे हैदराबादच्या संघाला लय सापडली नाही आणि 120 धावांत त्यांचा संघ ऑल आऊट झाला. केकेआरकडून वैभव अरोराने संघासाठी 3 विकेट्स घेतले तर वरून चक्रवर्तीने तिघांना माघारी धाडले. आंद्रे रसेलने संघासाठी 2 विकेट्स घेतले.
रघुवंशी, अय्यरची फटकेबाजी
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 200 धावा केल्या. केकेआरच्या डावाची सुरुवात खराब झाली. डिकॉक 1 तर सुनील नरेन 7 धावा काढून बाद झाले. यानंतर अजिंक्य रहाणेने यावेळी कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आणि संघाची धावगती रुळावर आणली. कारण कोलकाताची 2 बाद 16 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर केकेआरचा संघ पुन्हा एकगा गडगडणार का, असे वाटत होते. पण त्यावेळी रहाणेने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि संघाला सावरले. यावेळी अजिंक्यने अंगक्रीश रघुवंशीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. अजिंक्य यावेळी 38 धावांवर बाद झाला, पण संघाच्या मोठ्या धावसंख्येचा त्याने पाया रचला होता. या गोष्टीचा चांगलाच फायदा रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. रघुवंशीने 32 चेंडूत 50, वेंकटेश अय्यर 29 चेंडूत 60 धावांचे योगदान दिले. याशिवाय, रिंकू सिंगने 17 चेंडूत नाबाद 32 धावांची तुफानी खेळी केल्यामुळे केकेआरला 200 धावांचा टप्पा गाठता आला. हैदराबादकडून शमी, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
सनरायजर्सचे तारे जमीनपर
केकेआरविरुद्ध सनरायजर्सला सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. सनरायजर्स हैदराबादने आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या हैदराबादची कामगिरी यंदा समाधानकारक नाही. त्यामुळे यावेळी हैदराबाद कमबॅक करणार का ते पाहावे लागेल. हैदराबादवर विजय मिळाल्यानंतर केकेआरने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर, सनरायजर्स हैदराबादचा संघ शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.
संक्षिप्त धावफलक
केकेआर 20 षटकांत 6 बाद 200 (अजिंक्य रहाणे 38, रघुवंशी 50, वेंकटेश अय्यर 60, रिंकू सिंग नाबाद 32, शमी, कमिन्स, अन्सारी व मेंडिंस प्रत्येकी एक बळी) सनरायजर्स हैदराबाद 16.4 षटकांत सर्वबाद 120 (ट्रेव्हिस हेड 4, नितीश कुमार रे•ाr 19, कमिंदू मेंडिस 27, क्लासेन 33, पॅट कमिन्स 14, वैभव अरोरा व वरुण चक्रवर्ती प्रत्येकी 3 बळी, आंद्रे रसेल 2 बळी).









