वृत्तसंस्था/ हैदराबाद
विश्व कार रेसिंग संघटनेतर्फे 2023-24 च्या कार रेसिंग वेळापत्रकाची औपचारिक घोषणा मंगळवारी करण्यात आली. दरम्यान या वेळापत्रकामध्ये हैदराबादला वगळण्यात आले आहे.
2024 च्या फॉर्म्युला ई कार रेसिंग स्पर्धा वेळापत्रकाची प्राथमिक स्वरुपी घोषणा करण्यात आली पण हैदराबादबरोबर चार वर्षांचा करार करूनही त्यांना वगळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. चालू वर्षीच्या प्रारंभी हैदराबादने भारतात झालेल्या पहिल्या फॉर्म्युला इ स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते. दरम्यान फेब्रुवारी या स्पर्धांसाठी दोन तारखा खाली असून कदाचित या कालावधीत भारतामध्ये फॉर्म्युला इ शर्यतीचे पुनरागमन होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मोटो स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये चालू वर्षाच्या प्रारंभी हैदराबाद इ ग्राप्रि शर्यत 11 फेब्रुवारीला झाली होती. दरम्यान 2024 साली 10 आणि 24 फेब्रुवारी यापैकी एका दिवशी कदाचित हैदराबादमध्ये पुन्हा ही स्पर्धा घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताने यापुर्वी म्हणजे 2013 साली एफआयएची पहिली स्पर्धा यशस्वीपणे भरवली होती. 2023-24 च्या फॉर्म्युला इ हंगामाला 13 जानेवारीपासून मेक्सिको सिटी येथे प्रारंभ होणार आहे.









