सनरायजर्स हैदराबादचा 6 गडी राखून विजय : सामनावीर अभिषेक शर्माची 20 चेंडूत 59 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ लखनौ
लखनौ सुपर जायंटस संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सनरायजर्स हैदराबादनं 6 विकेटनं विजय मिळवत आपली पराभवाची मालिका थांबवली. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करुन हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. लखनौने पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 बाद 205 धावा केल्या होत्या. हैदराबादने 19 षटकांतच ही धावसंख्या पूर्ण केली. लखनौला मात्र होम ग्राऊंडवर दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
प्रारंभी, हैदराबादने नाणेफेक जिंकत लखनौला फलंदाजीला आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना लखनौला मिचेल मार्श व मॅरक्रम यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना 115 धावांची सलामी दिली. मार्शने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 39 चेंडूत 6 चौकार व 4 षटकारासह 65 धावांची खेळी साकारली. त्याला मॅरक्रमने 38 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारासह 61 धावा करत चांगली साथ दिली. मार्शला हर्ष दुबेने बाद करत ही जोडी फोडली. यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार ऋषभ पंत 7 धावा करुन स्वस्तात माघारी परतला. पाठोपाठ मॅरक्रमलाही हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले.
यानंतर निकेल्स पूरनने 26 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 45 धावांची खेळी साकारत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. त्याला इतर फलंदाजांची मात्र साथ मिळाली नाही. आयुष बडोनी, अब्दुल समाद व शार्दुल ठाकूर हे स्टार खेळाडू स्वस्तात बाद झाल्याने लखनौला 20 षटकांत 7 बाद 205 धावापर्यंत मजल मारता आली.
हैदराबादचा दणकेबाज विजय
लखनौने विजयसाठी दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. अथर्व ताडे 13 धावा करुन बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा व इशान किशन यांनी 82 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. अभिषेक शर्माने लखनौच्या गोलंदाजांची तुफानी धलुई करताना चौफेर फटकेबाजी केली. त्याने 20 चेंडूत 4 चौकार व 6 षटकारासह 59 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. इशान किशन 35 धावा करुन आऊट झाला. इशान बाद झाल्यानंतर हन्रिक क्लासेन व कमिंदू मेंडिस यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. क्लासेनने आक्रमक खेळताना 28 चेंडूत 47 धावा फटकावल्या तर मेंडिसने 32 धावांचे योगदान दिले. या जोरावर हैदराबादने विजयी लक्ष्य 18.2 षटकांतच पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंटस्स 20 षटकांत 7 बाद 205 (मिचेल मार्श 65, मॅरक्रम 61, निकोल्स पूरन 45, इशान मलिंगा 2 बळी, हर्ष दुबे, हर्षल पटेल व नितीश कुमार रे•ाr प्रत्येकी एक बळी)
सनरायजर्स हैदराबाद 18.2 षटकांत 4 बाद 206 (अथर्व ताडे 13, अभिषेक शर्मा 20 चेंडूत 4 चौकार व 6 षटकारासह 59, इशान किशन 35, क्लासेन 47, कमिंदू मेंडिस 32, दिग्वेश राठी 2 बळी, ओरुके व शार्दुल ठाकूर प्रत्येकी एक बळी).
अभिषेक शर्माचा आणखी एक कारनामा
अभिषेक शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत चौथ्यांदा 20 चेंडूंपेक्षा कमी वेळात अर्धशतक पूर्ण केले आहे. या बाबतीत, त्याने निकोलस पूरनची बरोबरी केली आहे, ज्याने आयपीएलमध्ये चार वेळा 20 पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक केले आहे. अभिषेकचा आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक 16 चेंडूत होता, जो त्याने 2024 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध केला होता. लखनौसाठी मिचेल मार्श आणि निकोलस पूरनने अनुक्रमे 65 आणि 45 धावांची स्फोटक खेळी केली, परंतु अभिषेक शर्मासमोर हे सर्व फिके पडले.









