ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शारजाहून हैदराबादला येणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे पाकिस्तानच्या कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईन्सच्या शारजा-हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून क्रू मेंबर्सने तातडीने विमानाचे लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. जवळच्या कराची विमानतळाशी संपर्क साधून विमान त्या दिशेने वळवलं. त्यानंतर कराची विमानतळावर या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना हैदराबाद येथे जाण्यासाठी एका अतिरिक्त विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी पाच जुलै रोजी स्पाइसजेट विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्या विमानातही तांत्रिक बिघाड झाला होता. ते विमान दिल्लीहून दुबई येथे जात होते.
हेही वाचा : ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांच्या ट्विटने चर्चांना उधाण









