पुढील महिनाभर धावणार रेल्वे
प्रतिनिधी/ बेळगाव
साऊथ सेंट्रल रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या हैदराबाद-बेळगाव एक्स्प्रेसचे बेळगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली हैदराबाद-बेळगाव रेल्वे सध्या दिवाळी सुटीनिमित्त साप्ताहिक स्वरुपात सुरू करण्यात आली आहे. यामुळे मंत्रालयसह हैदराबादला पोहोचणे सोयीचे होत आहे.
गुरुवार दि. 23 ऑक्टोबरपासून या साप्ताहिक रेल्वेला सुरुवात झाली. शुक्रवारी 24 रोजी दुपारी 1 वाजता ही रेल्वे हैदराबादच्या दिशेने रवाना झाली. बेळगावमधील प्रवाशांनी रेल्वेचे स्वागत केले. रेल्वेच्या इंजिनला हार घालून पूजा करण्यात आली. बेळगाव कोअर डेव्हल्पमेंट ग्रुपचे श्रीधर हुलीकवी यांच्यासह इतर सदस्यांनी स्वागत केले. पहिल्याच दिवशी या रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळाला. दुपारी 1 वाजता निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता हैदराबादला पोहोचणार आहे. यामुळे हैदराबाद येथे नोकरी-व्यवसायानिमित्त असलेल्या बेळगावकरांना एक्स्प्रेस महत्त्वाची ठरत आहे. सध्या सुट्यांचा कालावधी असल्याने हैदराबाद येथे फिरावयास जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर असे दोन महिने ही एक्स्प्रेस धावणार आहे.
रेल्वे कायम करण्याची मागणी
यापूर्वीच्या खासदार मंगला अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-हैदराबाद व त्यानंतर बेळगाव-मनुगुरू एक्स्प्रेस सुरू झाली. या एक्स्प्रेसला प्रतिसादही उत्तम मिळत होता. परंतु, रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे कारण देत रेल्वे बंद करण्यात आली. मागील वर्षभरापासून ही एक्स्प्रेस बंद होती. सध्या उत्सवकाळात एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असल्याने ती बेळगावच्या प्रवाशांसाठी कायमस्वरुपी करण्याची मागणी केली जात आहे.









