जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील प्रकाराने नाराजी, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. आता त्याला लागूनच पुन्हा एका बाजूच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे तरी काम लवकर होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील 100 ते 150 मीटरचा रस्ता करण्यात येत आहे. हा रस्ता करण्यासाठी कंत्राटदाराने चार महिने लावले आहेत. सतत गजबजलेल्या या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे त्याविरोधात अनेकांनी तक्रारी दिल्या. तरीदेखील हे काम शिघ्रगतीने पूर्ण करण्यात आले नाही. आता एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करणेदेखील अवघड जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. त्याला लागूनच अजूनही मातीचे ढीग तसेच ख•s तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ये-जा करणे अवघड झाले आहे. हा रस्ता करण्यासाठी अधिक मनुष्यबळाचा वापर करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









