शिरवळ खून प्रकरण: पाचाळ यास जन्मठेप व दंडाची शिक्षा
शिरवळ : १९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.५३ वाजता शिरवळ हद्दीत झालेल्या खुनप्रकरणी आरोपी अशोक रामचंद्र पाचाळ (रा. शिरवळ) यास जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५,००० रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर घटना ही कौटुंबिक वादातून घडली होती. आरोपी अशोक पाचाळ याने भांडणातून चिडून घरातील स्वयंपाकाच्या तव्याने पत्नी मंगला अशोक पाचाळ यांच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला होता. या घटनेवरून शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्र. १५/२०२१ भादंवि कलम ३०२ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (नि.) यु. आर. हजारे यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी अति. जिल्हा न्यायाधीश वाई यांच्या न्यायालयात झाली.
सरकार तर्फे अति. सरकारी अभियोक्ता आशीर्वाद आर. कुलकर्णी, दयाराम एस. पाटील व . महेश यु. शिंदे यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांच्या ठोस पुराव्यावरून आरोपीस दोषी ठरविण्यात आले.
या प्रकरणाच्या यशस्वी निकालासाठी पोलीस अधीक्षक . तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी तपास अधिकाऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलवडे, तपासी अधिकारी यु. आर. हजारे, पैरवी अधिकारी पो.कॉ. सपकाळ (ब. क्र. ७८३) यांनी प्रकरणात मोलाचे परिश्रम घेतले.
तसेच पोलीस प्रॉसीक्युशन स्कॉडचे पो.कॉ. किर्तीकुमार कदम, पो.हवा. भुजंग काळे, मपो.हवा. कदम व सहा. फौजदार अविनाश डेरे यांनी या खटल्यात सहाय्य केले. या शिक्षेच्या निकालामुळे शिरवळ पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.








