शेतातील वस्तीवर राहत असूनही गौराबाई शेताकडे लक्ष देत नव्हत्या
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंद तांडा रस्त्यावरील पाटील वस्ती येथे पती-पत्नीत घरगुती कारणावरून वादावादी झाली. यामध्ये पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. शेतात ब्यात आला असून पत्नी ये-जा करत नसल्याच्या रागातून पतीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.
गौराबाई नीलकंठ पाटील (वय ६१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नीलकंठ भीमराव पाटील (वय ६५, रा. पाटील वस्ती, हत्तुर) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. नीलकंठ पाटील आनंद तांडा यांची हत्तूर ते रोड दरम्यान शेती आहे. त्या परिसराला पाटील वस्ती म्हणून ओळखतात. या ठिकाणी गौराबाई आणि नीलकंठ हे दोघे राहतात. शेतातील वस्तीवर राहत असूनही गौराबाई शेताकडे लक्ष देत नव्हत्या. यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते.
दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्या काही दिवस परगावी मुलांकडे राहण्यास जात होत्या. यानंतर त्या पुन्हा घरी आल्या की त्यांच्यात काही कारणाने वाद सुरु होता. दरम्यान, गुरुवारी अमावास्या असल्याने गौराबाई शेतातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या. नीलकंठ यांनी नेहमी शेतात येत नाही, आज कशी आली असे म्हणून शिवीगाळ केला. त्यानंतर तेथे पडलेली फरशी उचलून गौराबाईच्या डोक्यात घातली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गौराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी झालेल्या या घटनेची माहिती सायंकाळी उशिरा परिसरात समजली. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गौराबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती नीलकंठ यास ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.








