रायबाग तालुक्यातील बस्तवाड येथील घटना : महिलासह प्रियकराला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराबरोबर मिळून काटा काढल्याची घटना रायबाग तालुक्यातील बस्तवाड येथे घडली आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ 24 तासांत पोलिसांनी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
सिद्धव्वा आप्पासाब ओलेकर (वय 34), गणपती परसप्पा कांबळे (वय 38) दोघेही राहणार बस्तवाड, ता. रायबाग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी शनिवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
बस्तवाड येथील आप्पासाब ऊर्फ मच्छिंद्र तुकाराम ओलेकर (वय 45) याचा खून झाला आहे. बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बुवाची सौंदत्ती येथील कृष्णा नदीकाठावर असलेल्या सुगंधादेवी मंदिरानजीक टॉवेलने गळा आवळून आप्पासाबचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने डोक्यावर हल्ला करून त्याचा मृतदेह कृष्णा नदीत फेकून दिला आहे. खून झालेल्या आप्पासाबची बहीण महानंदा सिद्धाप्पा तोरत्तनवर, रा. मोरब यांनी रायबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पूजेसाठी म्हणून सुगंधादेवी मंदिराजवळ नेऊन आप्पासाबचा खून करण्यात आला आहे.
गणपती कांबळे व सिद्धव्वा ओलेकर यांच्यात अनैतिक संबंध होते. सिद्धव्वाचा पती आप्पासाबने त्याला विरोध केला होता. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने सिद्धव्वाने पतीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. रायबागचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर, उपनिरीक्षक शिवशंकर मुक्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खून प्रकरणाचा छडा लावला आहे.









