पत्नीची कबुली : उसाच्या मळ्यात आढळला होता मृतदेह : उमराणी येथील घटना : पोलिसांकडून तपास
चिकोडी : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील उमराणी येथे उसाच्या मळ्यात व्यक्तीचा झालेला खून शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून केल्याचे उघडकीस आले आहे. 10 डिसेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील उमराणी गावच्या हद्दीत इटनाळ गावच्या सीमेवर उसाच्या शेतमळ्यात श्रीमंत इटनाळ या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर व कंबरेखाली हत्याराने वार करून खून झाल्याचे समोर आले होते. त्याप्रकरणी चिकोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केल्यानंतर याप्रकरणी श्रीमंत यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपणच आपल्या पतीचा खून केल्याचे तिने कबूल केले आहे.
पती श्रीमंत हा दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन मारहाण करण्यासोबतच शारीरिक व मानसिक छळ करत होता. मला दुचाकी दे असे म्हणून वारंवार मारहाण करत छळ करत होता. या छळाला कंटाळून खून केल्याचे पत्नी सावित्रीने कबूल केले आहे. चिकोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचलकरंजी माहेर असलेल्या सावित्रीचा 15 वर्षांपूर्वी श्रीमंत यांच्यासोबत विवाह झाला होता. पण तो लग्न झाल्यापासून काही काम न करता दारूचे व्यसन करत होता. घरी काही देत नसे, पत्नी आपल्या माहेराकडून मदत घेऊन व स्वत: कष्ट करून घर चालवत होती.
या दाम्पत्याला मायाव्वा, सृष्टी, सूरज, रोशनी अशी चार मुले आहेत. घरात एक रुपया देखील न देता तुला काय करायचे आहे कर, मी काहीही पैसे देणार नाही असे सांगत होता. रोज मला दारू पिण्यासाठी पैसे दे असा तगादा लावत होता. 8 डिसेंबर रोजी पती ऊस तोडण्यासाठी जाऊन रात्री घरी परत येऊन दारूच्या नशेत शिवीगाळ केली. तसेच दुचाकी दे, अशी मागणी करत मला मारहाण केली. त्यानंतर रात्री उशिरा मुलीच्या अंगावर धावून गेला. यावेळी पत्नीने सोडवून घेतले. दारूच्या नशेत उद्या आपला जीव घेईल या भीतीने व वारंवार दुचाकी साठी व पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून रात्री दोनच्या दरम्यान झोपलेल्या पतीच्या डोक्यावर दगड घालून खून केला.
त्यानंतर घरातील खुरप्याने व मटन कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्याराने त्याचे तुकडे केले. त्यानंतर घरातील पाण्याच्या पिपमध्ये घालून शेजारच्या उसाच्या शेतात फेकून दिले. खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार व साहित्य विहिरीत फेकून देण्यात आले असल्याचे पत्नीने कबूल केले आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिसांनी पत्नी सावित्री हिला अटक करण्यात आली असून याप्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.









