तलवारीने वार करून पत्नीचा निर्घृण खून : वाठादेव डिचोली येथे भरदिवसा खळबळ
डिचोली : वाठादेव डिचोली येथील रोलिंगमील जवळ भर रस्त्यावर 32 वर्षीय पतीने आपल्याच 24 वर्षीय पत्नीचा भर रस्त्यात तलवारीने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. भररस्त्यात भरदुपारी घडलेल्या या तलवार थाराराने अनेकांचा थरकाप उडाला. दोन्ही पती-पत्नीमध्ये संबंध बिघडल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच पतीने पत्नीवर तलवारीने वार करून तिची जीवनयात्राच संपवली. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी वाठादेव डिचोली येथीलच मैनुद्दीन हवांगी या युवकास अटक केली आहे. अटक करण्यात आलेला युवक हा अत्यंत वादग्रस्त असून नियमित तो अंमलीपदार्थांचे सेवन करून पत्नीशी भांडत होता.
बाजारात लिंबू, आले, लसूण विक्री करण्याचा तो व्यवसाय करीत होता. या व्यवसायातील इतर विक्रेत्यांशी भांडणे करणे, त्यांना मारहाण करणे हे नित्याचेच त्याचे प्रकार होते. वादग्रस्त अशीच त्याची पार्श्वभूमी आहे. याच अंमलीपदार्थांच्या विळख्यात सापडल्याने पत्नी व चार वर्षीय मुलीकडे लक्ष न देता सदैव भांडणे उरकून काढून पत्नीला मारबडव करीत असल्याने पत्नी रबिया हवंगी (वय 24) यांनी त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात गुऊ. दि. 24 जुलै रोजी या दोघांमध्ये घटस्फोट घेण्याबाबतची अंतिम चर्चा झाली होती व काल शुक्र. दि 25 जुलै रोजी घटस्फोटाची प्रक्रिया हाती घेण्याचे ठरले होते. परंतु ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच पती मैनुद्दीन याने पत्नी रबियाचा तलवारीने सपासप वार करून भर रस्त्यातच खून केला.

रस्त्यावर पडताच तलवारीने वार
उपलब्ध माहितीनुसार ही खुनाची घटना काल शुक्र. दि. 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वाठादेव येथील रोलिंगमिलच्या रस्त्यावर घडली. रबिया हवंगी आपल्या 4 वर्षीय मुलीला ट्युशनसाठी सोडण्यास गेली होती. मुलीला सोडून वाठादेव येथे घरी परतत असताना मैनुद्दीन हवंगी याने आपल्या आय 20 या कारने भरधाव वेगाने येत थेट रबिया हिच्या दुचाकीला ठोकरले. या ठोकरित राबिय ही रस्त्यावर आडवी पडली. ती रस्त्यावर पडताच मैनुद्दीन हातात तलवार घेऊन गाडीतून उतरला व त्याने तिच्यावर सपासप वार करण्यास सुऊवात केली. तिच्या पोटावर, हातावर, मानेवर वार करून त्याने तलवार तिथेच घटनास्थळीस टाकून दिली आणि स्वत: थेट पोलिसस्थानकात शरण गेला.
या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावरून ये जा करण्रायांनी या घटनेची माहिती राबिया हिच्या कुटूंबियांना दिली. हा बातमी मिळताच रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या राबिया हिचा चुलता व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली व गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी गाडीत घालूनच डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र डिचोली इस्पितळात उपचार सुरू करतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व संशयित पती मैनुद्दीन याला याला ताब्यात घेऊन ठेवले. रबिया हिचा मृतदेह डिचोली येथून बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. नंतर डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक व इतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा केला व या खुनी हल्ल्यासाठी वापरलेली तलवार जप्त केली.
डिचोलीत प्रथमच तलावारीने हल्ला करून खून
डिचोलीत तलवारीने एकावर हल्ला करून त्याचे प्राण घेण्याची घटना ही प्रथमच घडली आहे. यापूर्वीही धारदार शस्त्रांनी, सुरी, चाकू, किंवा अन्य गोष्टींचा वापर करून हल्ला करून खून केल्याची अनेक प्रकरणे आहेत. परंतु भर रस्त्यात पतीकडून पत्नीलाच धारदार तलवारीनेच सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्याची घटना ही डिचोलीच्या इतिहासात पहिलीच असून या घटनेमुळे संपूर्ण वाठादेवबरोबरच डिचोलीही हादरली आहे. या संदर्भात डिचोली पोलिसांनी अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे तलवारी घरात किंवा सोबत घेऊन फिरणाऱ्यांची चौकशी करावी, त्यांचा शोधही घ्यावा व कडक कारवाई करावी, अशी ही मागणी जोर धरू लागली आहे.









