पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल : मांजरी यात्रेत केली होती मारहाण
बेळगाव : पती-पत्नीतील भांडणानंतर मारहाणीत जखमी झालेल्या हारुगेरी येथील एका युवकाचा बुधवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. यासंबंधी अंकली, ता. चिकोडी पोलीस स्थानकात पत्नीसह चौघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण बसप्पा मुळवाडकर (वय 32) रा. हारुगेरी, ता. रायबाग असे त्या युवकाचे नाव आहे. पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर प्रवीणची पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून काडापूर, ता. चिकोडी येथील आपल्या माहेरी रहात होती. 8 फेब्रुवारी रोजी यात्रेनिमित्त प्रवीण मांजरीत आला होता. यात्रेत पत्नीबरोबर त्याची भेट झाली.
यात्रेत झालेल्या भेटीनंतर प्रवीणने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीला आरडाओरड केली. त्यानंतर ही गोष्ट प्रवीणच्या पत्नीने आपल्या कुटुंबीयांना कळवली. याच मुद्द्यावर प्रवीणला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रवीणला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता बुधवार दि. 12 फेब्रुवारी रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून प्रवीणचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यासंबंधी अंकली पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता पत्नी पूजासह चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चिकोडीचे मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले, अंकलीचे पोलीस निरीक्षक नंदीश पुढील तपास करीत आहेत.









