सौंदत्ती न्यायालयातील घटना : संशयित पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : घटस्फोटासाठी दाखल दाव्याच्या सुनावणीला न्यायालयात आलेल्या पतीने पत्नी आणि सासूवर कोयत्याने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी भरदुपारी सौंदत्ती न्यायालयात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुत्तण्णा मुरग्याप्पा गणाचारी (वय 28, रा. चावटगी, ता. कित्तूर) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. पत्नी ऐश्वर्या (वय 21) आणि सासू अनुसूया बाळप्पा मट्टी (रा. करिकट्टी, ता. सौंदत्ती) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी येथील ऐश्वर्या हिचा विवाह 2024 मध्ये सौंदत्ती तालुक्यातील चावटगी गावातील मुत्तण्णासोबत झाला होता. लग्नानंतर उभयतांनी काही दिवस गुण्यागोविंदाने संसार केला. मात्र, क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले.
त्यामुळे मुत्तण्णाने घटस्फोटासाठी सौंदत्ती न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याची मंगळवारी सुनावणी होती. त्यामुळे दोघेही पती-पत्नी न्यायालयात हजर झाले. ऐश्वर्यासोबत तिची आई अनुसूयादेखील आली होती. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही कर अन्यथा तुला बघून घेऊ, अशी धमकी मुत्तण्णाने दिली. शिवीगाळ आणि मारहाणीसंदर्भातील माहिती न्यायाधीशांसमोर सांगू, अशी धमकी पत्नीने दिल्याने रागाच्याभरात पती मुत्तण्णाने आपल्याकडील कोयत्याने ऐश्वर्याच्या डोक्यात वार केला. हा प्रकार लक्षात येताच सासू अनुसूया मध्यस्थी करण्यासाठी गेल्या. मात्र, त्यांच्यावरही त्याने कोयत्याने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या मायलेकींना काहींनी उपचारासाठी हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये हलविले. घटनेची माहिती समजताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यासह हल्लेखोराला ताब्यात घेतले. घटनेची नोंद सौंदत्ती पोलीस स्थानकात झाली असून ऐश्वर्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.









