पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून निघृण खून केला
सांगली : संजयनगरजवळील शिंदे मळा येथे कौटुंबिक वादातून पती सिताराम रामचंद्र काटकर (वय ६५, रा. कुरणे गल्ली, शिंदे मळा) याने पत्नी अनिता काटकर (वय ६०) हिचा सकाळी पावणे सहाच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून निघृण खून केला. त्यानंतर स्वतःहून संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काटकर कुटुंब शिंदे मळ्यातील कुरणे गल्लीत राहते. कुटुंबाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. काटकर यांना एक मुलगा आहे. पत्नी सतत वाद करत असल्यामुळे पती सिताराम हा त्रस्त झाला होता. सततच्या वादाला कंटाळून शुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास त्याने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर व पाठीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन ती मृत झाली.
खूनानंतर सिताराम हा स्वतःहून संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा केला. पत्नी अनिता सतत भांडण करत असल्यामुळे तिचा खून केल्याची कबुली दिली. खुनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पोलीस उपअधीक्षक विमला एम. यांनी पोलिस ठाण्यात येऊन माहिती घेतली. पोलिस हवालदार सुदर्शन खोत यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे. संशयित आरोपी सिताराम याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सूरज बिजली अधिक तपास करत आहेत.








