दांपत्याच्या नावावर विश्वविक्रम
जगभ्रमंती करण्याचे स्वप्न जवळपास प्रत्येकाचे असते, परंतु काही मोजकेच जण हे स्वप्न पूर्ण करू शकतात. जेम्स रोजर्स अन् पेज पार्कर अशाच लोकांपैकी एक आहेत. हे दोघेही पती-पत्नी असून त्यांनी कारद्वारे 116 देशांची सैर केली आहे. त्यांच्यासारखी कामगिरी आजवर कुणीच करू शकलेला नाही. याचमुळे त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.
न्यूयॉर्क येथे राहणारे जेम्स रोजर्स अन् पेज पार्कर यांनी जगातील बहुतांश देशांना स्वत:च्या कारमधून प्रवास करत भेट दिली आहे. त्यांच्या या हिमतीला गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही दाद दिली आहे. दोघांनीही स्वत:चा प्रवास 1 जानेवारी 1999 रोजी आइसलँड येथून सुरू केला, त्यांच्याकडे एक हार्ड टॉप कन्व्हर्टिबल कार होती, जी एका मर्सिडीज बेंजसारखी होती आणि त्यात एक ट्रेलर जोडण्यात आला होता. जेम्स अन् पेज या दोघांनाही प्रवास करणे अत्यंत पसंत आहे. याचमुळे त्यांनी कारमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. फारसा विचार न करता दोघेही घरातून बाहेर पडले होते.पनामापासून जपानपर्यंत जगातील जवळपास प्रत्येक भागाला त्यांनी भेट दिली आहे. आम्ही कुठलाही विक्रम स्वत:च्या नावावर करण्यासाठी बाहेर पडलो नव्हतो. दुचाकीवरून मी जगभरात फिरलो होतो, परंतु पत्नीसोबत प्रवास करण्याची गोष्टच और होती. आम्ही जगातील अनेक सीमा, खराब रस्ते, हिमाच्छादित प्रदेश आणि युद्धग्रस्त क्षेत्रांमध्येही गेलो होतो असे जेम्स यांनी सांगितले आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये लोक काय करतात? ते स्वत:च्या जीवनाबद्दल कोणता विचार करतात हे जाणून घेण्याची या दांपत्याची इच्छा होती. याकरता कारमधून प्रवास करण्याशिवाय अन्य कुठलाच चांगला पर्याय नव्हता. आम्ही अनेक असाधारण अन् सामान्य लोकांना भेटलो. वाळवंटात अन् जंगलात प्रवास केला. महामारींना सामोरे गेलो. दिव्य अन् भयानक दोन्ही प्रकाराच्या भोजनाचा आनंद घेतला. प्रत्येक दिवस अनोखा आणि रोमांचक होता, असे जेम्स यांनी म्हटले आहे. जेम्स आणि पेज यांनी तीन वर्षे न थांबता प्रवास केला आहे. 2,45,000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर त्यांनी कापले आहे. सर्व 6 खंडांना त्यांनी भेट दिली आहे. लोक स्वत:चे काम किती चांगल्याप्रकारे करत आहेत हे आम्ही पाहू इच्छित होतो. या रोमांचक प्रवासाने मला ‘डोंट कॉल मी मिसेस रोजर्स’ हे पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहित केल्याचे पेज यांनी सांगितले आहे. या प्रवासाकरता आम्ही किती पैसे खर्च केले हे माहित नाही. कारण आम्ही पैसे जोडण्यावर कधीच लक्ष दिले नाही. आम्ही अधिकाधिक आठवणी साठवून आणू इच्छित होतो. याचमुळे पैशांची काळजी आम्ही कधीच केली नसल्याचे जेम्स यांचे सांगणे आहे.









