आपला देश अद्भूत परंपरा आणि चालीरितींचा देश आहे. येथे प्रत्येक समाजाची, प्रत्येक गावाची आणि प्रत्येक भागाची किमान एकतरी वैशिट्यापूर्ण परंपार असते. संबंधित लोक ती निष्ठेने शतकानुशतके आणि पिढ्यान्पिढ्या पाळतात आणि इतर लोकांना अशा परंपरांसंबंधी आदरयुक्त आकर्षण किंवा आश्चर्यही वाटत असते. मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर जिल्ह्याच्या एका भागात गुर्जर साली सकल नावाचा एक समाज आहे. या समाजात एक अद्भूत परंपरा आहे. या परंपरेनुसार वधू-वराचा विवाह झाल्यानंतर ते घरी आले की वधूला घरातील महिला भरपूर मारझोड करतात. अशा प्रकारे नव्या नवरा-नवरीच्या संसाराचा प्रारंभ घरच्या लोकांनी केलेल्या मारझोडीपासून होताना दिसून येतो.
मात्र, येथे एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, की ही मारझोड लाठ्याकाठ्यांनी किंवा शस्त्रांनी होत नाही. तर ती करण्यासाठी घरातील महिला घरातल्या जुन्या कपड्यांचे घट्ट असे गठ्ठे बनवितात आणि या गठ्ठ्यांनी ही मारझोड केली जाते. या मारझोडीमुळे वधूला काही प्रमाणात मुका मार लागतो, पण ते फारसे जखमी होत नाहीत, किंवा रक्तस्राव होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात ही मारझोड चालले. या समाजात या परंपरेने नेमके केव्हा स्थान मिळविले हे कोणालाही माहीत नाही, इतकी ती पुरातन आहे. पण आजच्या आधुनिक युगातही ती पूर्वीप्रमाणेच पाळली जाते. वधूही ही प्रथा आपल्या भल्यासाठीच आहे असे समजून सहन करते. या परंपरेचे पालन म्हणजे नवविवाहित जोडप्यासाठी आशीर्वाद देण्याचा आणि त्यांच्याप्रती स्नेह व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, असे समजले जाते. सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित वधूही या परंपरेचे आस्थेने पालन होऊ देतात हे वैशिष्ट्या आहे. मुख्य म्हणजे ही मारझोड पाहण्यासाठी शेजारी-पाजारी, आप्तस्वकीय आणि परिचित मोठ्या संख्येने उपस्थित असतात.









