गुळे – काणकोण येथील घटना, चालकाच्या बेदरकारपणाचा परिणाम : बसची झाडालाही धडक,,दोन प्रवासी गंभीर जखमी

काणकोण : कारवार ते मडगाव मार्गावर वाहतूक करणाऱ्या ‘व्हॉल्वो’ प्रवासी बसने ठोकर दिल्यामुळे पती-पत्नीचा दुर्दैवी अंत होण्याची घटना मंगळवारी सकाळी गुळे, काणकोण येथे घडली. या अपघातात ठार झालेले पायक काटू वागोणकर (वय 40 वर्षे) आणि त्याची पत्नी प्रियांका पायक वागोणकर (वय 38 वर्षे) हे गुळे येथून आपल्या हीरो पॅशन या मोटारसायकलने चापोली येथे जात असताना हा अपघात घडला. गुळे येथील श्री भूमिपुरुष देवालयाजवळच्या एका वळणावर मडगावच्या दिशेने जाणाऱ्या सदर बसने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला येऊन दुचाकीला धडक दिली. आणि मागच्या आसनावर बसलेली प्रियांका वागोणकर ही जागीच ठार झाली, तर अत्यवस्थ अवस्थेत काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी पायक वागोणकर याला मृत घोषित करण्यात आले. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या एन. नागराज (कर्नाटक) या ‘व्हॉल्वो’च्या बसचालकाला काणकोणच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात होण्यास सदोष रस्ताही कारणीभूत असून या अपघाताची खबर मिळताच काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी घटनास्थळी धाव घेतली. मडगावच्या दिशेने जाणाऱ्या या बसला झालेला अपघात हा केवळ बेदरकारपणे बस हाकण्याचा परिणाम असून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जातानाच समोरच्या एका झाडालाही बसने धक्का दिला. बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. त्यापैकी सोनल पिंटो या प्रवाशाच्या खांद्याला जबर दुखापत झाली असून अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही प्रवाशांवर काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आल्याची माहिती निरीक्षक गावस यांनी दिली.
‘भाषणबाजी बंद करून काम सुरू करा’
करमल घाट रस्त्याच्या ऊंदीकरणासाठी अमूक निधी मंजूर झालेला आहे अशी वक्तव्ये दररोज ऐकायला मिळतात. या सर्व गोष्टी कागदोपत्री असून आता ही वक्तव्ये बंद करावीत आणि प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करावा, अशी मागणी करत काणकोणच्या काही जागरूक नागरिकांनी या अपघातानंतर घटनास्थळी धाव घेऊन गुळेवासियांच्या भावनांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. रस्त्याचे ऊंदीकरण आज ना उद्या होणारच, त्यापूर्वी या रस्त्यावरील अपघातप्रवण क्षेत्रे दुरुस्त करा, अशी मागणी यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, रंगनाथ गावकर, नगरसेवक धीरज ना. गावकर, सामाजिक कार्यकर्ते शांताजी गावकर, श्रीस्थळचे माजी सरपंच सुहास वेळीप, उमेश नाईक आणि गुळेवासियांनी घटनास्थळी येऊन केली तसेच या रस्त्यावरील वाहतूक काही काळ रोखली. सरकार कोणाचेही असो, काणकोणवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आपला लढा चालूच राहील, असे मत शांताजी गावकर, राजेंद्र देसाई, धीरज ना. गावकर, उमेश नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस, सीआयडी विभागाचे सूर्यकांत सावळ, महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता सागर शेट्यो यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले.
अवजड वाहनांची वाहतूक बंद करा
या रस्त्याचे ऊंदीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी मागणी काणकोणचे जागरूक नागरिक कित्येक दिवसांपासून करत असून त्याचा पुनरुच्चार शांताजी गावकर यांनी केला. पर्यावरणाच्या नावाखाली रस्त्याचे ऊंदीकरण अडले आहे. हॉटमिक्स डांबरीकरण केल्यानंतर आता निदान उंचावलेल्या रस्त्याच्या कडा मातीचा भराव टाकून भरून काढाव्यात. या सदोष रस्त्यामुळे आपल्या वाड्यावरील दोघांचा हकनाक बळी गेला आहे, अशी प्रतिक्रिया चापोलीचे माजी पंच दामोदर च्यारी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
रस्ता ऊंदीकरणासाठी आठ दिवसांची मुदत
करमल घाट रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करताना रस्त्याच्या कडा उंच ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी भराव न टाकताच बिले कशी मंजूर झाली, असा सवाल करतानाच, महामार्ग विभागाच्या ज्या अभियंत्यांवर ही जबाबदारी होती त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली. पक्षशिस्तीमुळे प्रत्यक्ष जरी बोलू शकलो नसलो, तरी जे काही चालले आहे ते ठीक नसल्याचे मत त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, आठ दिवसांत जर या रस्त्याच्या रुंदीकरणाला प्रारंभ केला गेला नाही, तर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक अडवून ठेवली जाईल, असा स्पष्ट इशारा गुळे येथील ग्रामस्थ आणि काणकोणच्या अन्य जागरूक नागरिकांनी दिला आहे.
पत्नीला घेऊन घरी परतत असताना काळाचा घाला
गुळे येथे 24 रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनाला वागोणकर दांपत्य उपस्थित होते. स्नेहसंमेलन संपल्यानंतर रात्री पायक वागोणकर आपल्या घरी गेला आणि 25 रोजी सकाळी परत गुळे येथे येऊन आपल्या पत्नीला चापोली येथे घेऊन जात असताना दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला. मयत पायक वागोणकर हा चापोली येथे परदेशी नागरिकांकडून चालविण्यात येत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या पायकचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
पणजीतील अपघातात केटीएमचालकाचा मृत्यू
पणजी गोमुख येथे झालेल्या अपघातातील युवकाचे गोमेकॉत निधन झाले. पोलिसांनी दुचाकीस्वाराविरोधात भादंसंच्या कलम 279, 337, 304 (ए) तसेच मोटर कायद्याच्या 180, 196 व 190 (2) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
अपघातात निधन झालेल्या युवकाचे नाव नारायण च्यारी (वय 38, हणजूण) असे आहे. हा अपघात 24 रोजी रात्री झाला होता. जीए-03-इ-4078 क्रमांकाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून आनंद गडेकर (वय 18 वर्षे ) गोमुख येथून 18 जून रस्त्याच्या दिशेने येत होता, तर जीए-03-एई-7800 क्रमांकाच्या केटीएम दुचाकीवरून नारायण च्यारी हा मनोशांती हॉटेलकडून महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने गोमुख येथे पोचली असता दोन्ही दुचाकींची टक्कर झाली. अपघातात जखमी झालेल्या केटीएम चालक नारायण च्यारी याला गोमेकॉत दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना काल मंगळवारी त्याचे निधन झाले. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









