वृत्तसंस्था/ सोफिया (बल्गेरिया)
येथे सुरू असलेल्या 74 व्या स्ट्रेंजा स्मृती आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीन आणि विश्वामित्र चोंगथम यांनी आपल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिलांच्या विभागात सिमरनजित कौर आणि ज्योती यांनी शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले आहे.
पुरुषांच्या 57 किलो वजनगटात मोहम्मद हुसामुद्दीनने इटलीच्या मिचेल बेलडेसीचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. आता या वजन गटात हुसामुद्दीन आणि अर्मेनियाचा आर्टर यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. मोहम्मद हुसामुद्दीनने दोन वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक तसेच 2021 च्या आशियाई स्पर्धेत युवा चॅम्पियनशीप पटकाविली होती.
पुरुषांच्या 51 किलो वजनगटात भारताच्या विश्वामित्र चोंगथमने कझाकस्थानच्या केंझी मुरातुलीचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. आता विश्वामित्र आणि अमेरिकेचा रॉच जॉर्डन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. 92 किलो वजनगटात भारताच्या संजीतला पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या टॅली जेमारकडून हार पत्करावी लागली. संजीतने 2021 च्या आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
महिलांच्या विभागात 2018 च्या विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱया भारताच्या सिमरनजित कौर आणि ज्योती यांनी आपल्या वजनगटातून प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या 60 किलो वजनगटात भारताच्या सिमरनजितने ऑस्ट्रेलियाच्या डॅनिली स्केनलॉनचा 5-0 तर 52 किलो गटात ज्योतीने उझ्बेकच्या बुलट्रोव्हाचा 5-0 असा फडशा पाडला. मात्र, 75 किलो वजनगटात भारताच्या अरुंधती चौधरीला ऑस्ट्रेलियाच्या पार्करकडून 1-4 अशी हार पत्करावी लागली.









