अब्जावधी डॉलर्सचे नुकसान : 27 जणांचा बळी : नौदलाचे अधिकारी बेपत्ता
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोत धडकलेल्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ओटिसने अकापुल्कोच्या किनारी क्षेत्रात मोठे नुकसान घडविले आहे. ओटिस चक्रीवादळामुळे आतापर्यंत 27 जणांना जीव गमवावा लागला असून अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती मेक्सिकोच्या सरकारने दिली आहे.
ओटिस चक्रीवादळानु मेक्सिकोत मोठी हानी घडविली असून रस्त्यांवर अतिवृष्टीमुळे पाणी जमा झाले तर घर अन् हॉटेल्सचे छत प्रचंड वाऱ्यांमुळे उडून गेले आहे. अनेक वाहने पाण्यात बुडाली असून दूरसंचार, रस्ते आणि हवाई वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.
चक्रीवादळानंतर 4 जण अद्याप बेपत्ता आहेत. अकापुल्कोला जे सहन करावे लागले ते वास्तवात विध्वंसक होते असे उद्गार मेक्सिकोचे अध्यक्ष एंड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर यांनी काढले आहेत. ओटिस या चक्रीवादळामुळे शेकडो वृक्ष उन्मळून पडले आहेत. या चक्रीवादळानंतर रुग्णालयांमध्ये पाणी भरल्याने रुग्णांना उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. सरकारने संबंधित क्षेत्रात आपत्कालीन स्थिती घोषित केले आहे.
सरकारने आतापर्यंत ओटिस चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अनुमान व्यक्त केलेला नाही. परंतु एका अहवालानुसार 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तर या चक्रीवादळानंतर नौदलाचे अधिकारी आणि नौसैनिक बेपत्ता झाल्याचे समजते. या नौसैनिकांचा शोध घेण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
8400 सैनिक तैनात
सफाई प्रयत्नांमध्ये सहाय्यासाठी मेक्सिकोचे सैन्य, वायुदल आणि राष्ट्रीय गार्डच्या सुमारे 8100 सदस्यांना अकापुल्कोमध्ये आणि त्याच्या आसपास तैनात करण्यात आले आहे. अकापुल्को हे ग्युरेरो राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. स्थानिक अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर निर्भर आहे. ओटिस चक्रीवादळाने सागर किनारी क्षेत्रात असलेल्या काही प्रसिद्ध हॉटेल्सचे मोठे नुकसान केले आहे. अकापुल्कोच्या विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.









