जिल्ह्यात प्रथमच सापडले शिकारशिल्प : चिरेखाणींचा विळखा ठरतोय घातक
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.
साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच ते अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. सिद्धेश आचरेकर, अनिकेत पाटील यांनी या युवकांसह त्या ठिकाणी जाऊन या कातळशिल्पांची स्वच्छता केली व त्याभोवती दगड रचून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले.









