मालवण : प्रतिनिधी
देवबाग गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळे येत आहेत. वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अडथळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालवणच्या कार्यालयासमोर देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडले.
मालवण- देवबाग हा रहदारीचा मुख्य रस्ता असुन देवबाग गावामध्ये वाहनाच्या रहदारीला होणारे अडथळे तसेच गावातील वाढते पर्यटन त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे देवबागवासियांना प्रवास करते वेळी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ज्याठीकाणी वाढीव जागा मिळेल तेथे वाढीव रस्ता करण्यात यावा, तसेच रस्त्याच्या बाजुला असलेले वाढीव कंपाउंड जशी जागा उपलब्ध होईल तसे वाढीव बांधकाम हटवून वाहतुकीसाठी अधिक रस्ता खुला करण्यात यावा, त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण व्हावे. अशी मागणी देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
दरम्यान जिप बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्ती साठी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र रस्ता भूसंपादन बाबत माहिती नाही. तरीही ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल तेथे रस्ता रुंदीकरण केले जाईल. याठिकाणी प्रस्तावित कामास असलेली स्थगिती उठल्यास लवकरात लवकर पुढील कार्यवाही केली जाईल. रस्ता रुंदीकरण बाबत २ कोटी निविदा प्रक्रिये बाबत पुढील कार्यवाही होईल. असे बांधकाम अधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान सरपंच उल्हास तांडेल म्हणाले, शासन दरबारी याबाबत पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री याचेही लक्ष वेधले जाईल. तसेच २८ ऑगस्ट रोजी ग्रामसभा बोलावून याबाबत ग्रामस्थ यांची भूमिका जाणून घेत पुढील भूमिका ठरवली जाईल. असे सांगितले. यावर बांधकाम विभाग अधिकारी यांनी आपले सर्व सहकार्य आपल्याला राहील. असे सांगित उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.
अखेर बांधकाम अधिकारी, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, अन्य पोलीस अधिकारी तसेच देवबाग उपसरपंच तात्या बिलये, सदस्य अण्णा केळुसकर, सदस्य पास्कॉल (बाबा) रॉड्रिंक्स, अभिषेक कंदलगावकर, जितू भाबल, जिजी गावडे यांच्या उपस्थितीत सरपंच उल्हास उपोषण स्थगित केले.









