लहान रोपे नष्ट, वनखात्याला फटका : मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान
बेळगाव : मागील महिन्याभरात वादळी वारे आणि पावसाने शेकडो वृक्ष जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे वनखात्याला फटका बसला आहे. शिवाय सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी वनखात्यामार्फत लाखो रोपांची लागवड केली जाते. मात्र नैसर्गिक आपत्तीचा फटका वनखात्याला बसतो. वादळी वारे आणि पावसामुळे जुनाट वृक्षांबरोबर नवीन लहान रोपांचे नुकसान होते. त्यामुळे रोप लागवडीसाठी केलेला खर्चही पाण्यात गेला आहे. मागील महिन्याभरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जुनाट मोठ्या वृक्षांबरोबर लहान रोपांची पडझड झाली आहे. त्यामुळे वनखात्याला फटका बसला आहे. विशेषत: वनखात्याच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्याच्या प्रारंभी लाखो रोपांची लागवड होते.
रस्त्यांच्या दुतर्फा, खुल्या जागा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी शाळा आदी ठिकाणी लागवड झाली आहे. मात्र वादळी वाऱ्याने या रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा खात्याला नष्ट झालेल्या ठिकाणी नव्याने रोपांची लागवड करावी लागणार आहे. झाडांची संख्या वाढावी आणि पर्यावरण संतुलनासाठी रोप लागवडीवर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे दरवर्षी वादळी वाऱ्यामुळे रोपांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्याने नष्ट झालेल्या ठिकाणी नव्याने रोप लागवड करावी लागणार आहे. यासाठीचा खर्च वनखात्याच्या डोक्यावर बसणार आहे. एका लहान रोपाच्या संवर्धनासाठी वनखाते हजार ते दोन हजार रुपये खर्च करते. मात्र काही क्षणात नैसर्गिक आपत्तीमुळे हे वृक्ष जमीनदोस्त झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या वृक्षाबरोबर लहान दोन-चार वर्षांच्या रोपांचेही नुकसान झाले आहे, अशी माहिती वनखात्याने दिली आहे.









