प्राथमिक शिक्षकापासून कार चालकाचाही समावेश : एकापेक्षा अनेकवेळा दिली सेवा मुदतवाढ,पगारावर जनतेच्या खिशातून कोट्यावधी खर्च
पणजी : सरकारच्या विविध खात्यात निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवावाढ देण्यास त्यांच्याच कर्मचाऱ्यांचा कितीही विरोध असला तरीही गेल्या सुमारे 13 वर्षात शेकडो कर्मचारी, अधिकाऱ्यांना सहा महिने ते एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पगारावर कोट्यावधी ऊपये खर्च करण्यात आले आहेत. आमदार वेन्झी व्हिएगश यांनी त्यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यांना देण्यात आलेल्या उत्तरातून ही संख्या समोर आली आहे. 1 जानेवारी 2020 पासून आजपर्यंत सेवावाढ ही सेवावाढ देण्यात आली असून प्रधान मुख्य अभियंता सारख्या पदावरील सुद्धा अनेक बड्या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. यापैकी काही जणांना तर एकापेक्षा जास्त वेळा सेवावाढ देऊन सरकारने मेहरनजरच केली असल्याचेही या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. सेवावाढ देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांध्ये साबांखा, वीज आणि जलस्रोत या खात्यांचा अग्रक्रम आहे. त्याशिवाय आरोग्य, शिक्षण, पोलीस, आदी खात्यांमध्येही अनेकांना सेवावाढ देण्यात आली आहे. तसेच तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, पर्सोनेल, पर्यटन, नियोजन सांखिकी, गोमेकॉ, समाज कल्याण, क्रीडा, पंचायत, जिल्हा न्यायालय आदी खात्यांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका प्रकरणात तर चक्क वाहन चालकास एका वर्षाची सेवावाढ देण्यात आल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे सेवावाढ मिळविण्यात यशस्वी ठरलेले या अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये किमान 50 हजार ते 2.65 लाख ऊपयेपर्यंत पगार घेणाऱ्यांचा समावेश दिसून आला आहे. सरकारतर्फे देण्यात आलेल्या उत्तराच्या प्रतीच 500 पानांपेक्षा जास्त असल्यामुळे काही निवडक अधिकाऱ्यांचीच नावे आम्ही घेतली असून त्यावरून सेवावाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाचकांच्या लक्षात येईल. आतापर्यंत सेवावाढ मिळालेले व सध्या सेवावाढीवर काम करणारे अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत
गोवा नागरी सेवेतील अधिकारी एस पी सिग्नापूरकर यांना प्रत्येकी सहा महिन्यांसाठी दोनदा सेवावाढ देण्यात आली. 2018 मध्ये जून ते नोव्हेबर आणि पुन्हा डिसेंबर 2018 ते मे 2019 या कालावधीत विशेष भू संपादन अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. कायदा खात्यातील अतिरिक्त सचिव शरद मराठे यांना जुलै 2018 मध्ये निवृत्तीनंतर सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली होती. कृषी संचालक उल्हास पै काकोडे यांना एप्रिल 2017 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली होती. याच कालावधीत (जुलै 2017) पशुसंवर्धन खात्यातील साहाय्यक संचालक डॉ. सुरेंद्र नाईक यांना सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली होती. वीज खात्यातील अधिक्षक अभियंता एन निलकंठ रे•ाr यांना ऑगस्ट 2017 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत 14 महिन्यांसाठी सेवा मुदतवाढ देण्यात आली होती. याच खात्यातील कार्यकारी अभियंता जुझे डिमेलो यांना जुलै 2018 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली होती. त्यानंतर कार्यकारी अभियंता रेश्मा मॅथ्यू यांना जून 2019 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली. याच कालावधित (जून 2019) अन्य एक कार्यकारी अभियंता सी. राजगोपालन यांना आणि कार्यकारी अभियंता सुनिल वाडेकर तसेच कार्यकारी अभियंता देवदासन ए यांना प्रत्येका चार महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली.
जून 2021 मध्ये कार्यकारी वीज अभियंत संतोष लोलयेकर, साहाय्यक अभियंत ए चंद्रन यांना प्रत्येकी चार महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली. वरिष्ठ वायरलेस तंत्रज्ञ महेंद्र महात्मे यांना फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 23 या एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आली. जलस्रोत खात्यातील हायड्रोलॉजिस्ट अनिल फातर्पेकर यांना मे 2017 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली. याच खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना जून 2022 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली. अधिक्षक अभियंता कृष्णकांत पाटील यांना एप्रिल 2023 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खत्याचे मुख्य अभियंता पी. बी. शेलडारकर यांना डिसेंबर 2019 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली. याच खात्यातील अधीक्षक अभियंता दिलीप ढवळीकर यांना जानेवारी 2020 मध्ये गोवा मलनिस्सारण साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सेवावाढ देण्यात आली होती. कार्यकारी अभियंता गणेश वेळीप यांना ऑक्टोबर 2021 मध्ये, मुख्य अभियंता डी. सी गुप्ता यांना जुलै 2022 मध्ये, कार्यकारी अभियंता प्रकाश पै यांना सप्टेंबर 2022 मध्ये प्रत्येकी सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली होती. शिक्षण खात्यात उपसंचालक गजानन भट यांना जानेवारी 2018 मध्ये एका वर्षासाठी खात्याचे संचालक म्हणून, तर उपसंचालक संतोष आमोणकर यांना ऑक्टोबर 2020 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली होती. कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांना डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या 13 महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली होती.
सध्या सेवावाढीवर काम करणारे अधिकारी
- पोलीस अधिक्षक बोसुएट सिल्वा यांना एप्रिल 2023 मध्ये सहा महिन्यांसाठी सेवावाढ देण्यात आली आहे.
- साबांखा प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर फेब्रुवारी 2023 पासून एका वर्षासाठी काम करत आहेत.
- साबांखा अधीक्षक अभियंता संतोष म्हापणे फेब्रुवारी 2023 पासून एका वर्षासाठी काम करत आहेत.
- साबांखा अधीक्षक अभियंत सुधीर परब मे 2023 पासून एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आली आहे.
- केपे सरकारी महाविद्यालयाच्या प्राध्यापक सुशिला मेंडिस मे 2023 पासून एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आली आहे.
- जलस्रोत मुख्य अभियंता प्रमोद बदामी जून 2023 पासून एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आली आहे.
- जलस्रोत कार्यकारी अभियंता कृष्णानंद नाईक जून 2023 पासून एका वर्षासाठी सेवावाढ देण्यात आली आहे.