4 हजार जवानांची मोहीम : आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक : ड्रोन-हेलिकॉप्टरचा होतोय वापर
वृत्तसंस्था/बस्तर
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रहार करण्यात आला आहे. येथे सुरक्षा दलांनी सुमारे शेकडो नक्षलवाद्यांना घेरले आहे. नक्षलवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान चकमक सुरू झाली असून ती पुढील काही दिवसांपर्यंत चालू शकते. तर गुरुवारी संध्याकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 हून अधिक नक्षलवादी मारले गेले असून मोहीम समाप्त होईपर्यंत हा आकडा अत्यंत मोठा ठरू शकतो.
छत्तीसगडच्या बीजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवरील ‘करेगुट्टा’ पर्वतीय क्षेत्रात सीआरपीएफच्या नेतृत्वात 72 तासांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन ‘ऑल आउट’ अंतर्गत मोठ्या संख्यात नक्षली कमांडर्सच्या खात्म्याचे वृत्त समोर येऊ शकते. या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफची जीडी बटालियन, कोब्रा जवान, छत्तीसगड पोलिसांचे डीआरजी, स्पेशल टास्क फोर्स आणि तेलंगणा पोलीस सामील झाले आहेत. ड्रोन-हेलिकॉप्टर-मोर्टारने युक्त 4 हजार जवानांनी या भागात नक्षलवाद्यांना घेरले आहे. या भागात नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी आयईडी पेरले आहेत. अत्यंत मोठ्या जोखिमीदरम्यान सुरक्षा दलांनी आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
नक्षलवाद्यांचे टॉप लीडर हिडमा, देवा आणि सुधाकर देखील सुरक्षादलांच्या जाळ्यात अडकले आहेत. नक्षलवाद्यांच्या विरोधातील या मोहिमेवर सीआरपीएफचे महासंचालक रायपूर येथून नजर ठेवुन आहेत. याचबरोबर बस्तरचे महानिरीक्षक सुंदरराज पी आणि सीआरपीएफचे अनेक अधिकारी हे ‘ऑल आउट’ ऑपरेशनवर नजर ठेवून आहेत.
हा भाग छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असून येथील घनदाट जंगल आणि पर्वतांदरम्यान नक्षलवाद्यांनी स्वत:च्या बटालियनचा तळ निर्माण केला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून दीर्घकाळापासून या तळावर नजर ठेवली जात होती. नक्षलींचे टॉप लीडर आणि कमांडर या तळावर ये-जा करत राहिले होते. येथूनच नक्षलवाद्यांनी सुरक्षादलांच्या विरोधातील कारवायांचे संचालन केले होते. नक्षलवाद्यांच्या विरोधात ही मोहीम सुरू करण्यापूर्वी सीआरपीएफच्या नेतृत्वात छत्तीसगड आणि तेलंगणा पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. याच बैठकीत ‘ऑपरेशन ऑल आउट’चा आराखडा तयार करण्यात आला होता. मागील तीन दिवसांपासून सुरक्षा दल या मोहिमेत सामील आहेत.
नक्षलींकडून आयईडीचा वापर
नक्षलवाद्यांनी या घनदाट जंगलात अनेक आयईडी पेरून ठेवल्याने सुरक्षा दलांना काळजीपूर्वक पावले उचलावी लागत आहेत. नक्षलवाद्यांचा अचूक ठावठिकाणा कळण्यासाठी तांत्रिक उपकरणांची मदत घेतली जात आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतोय. नक्षलींनी मोठ्या संख्येत गोळीबार केल्यास मोर्टारने प्रत्युत्तर दिले जात आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे 300 नक्षलवाद्यांना वेढले गेल्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांनी चहुबाजूने पर्वताला वेढले आहे. तसेच सुमारे 10 किलोमीटरच्या क्षेत्रात जवान तैनात करण्यात आले आहेत. चकमक स्थळावरून नक्षलवादी बाहेर पडल्यास त्याला वाटेतच कंठस्नान घातले जात असल्याचे समजते.









