सध्या एक अत्यंत दाहक व्हिडीओ प्रसारित होत आहे. तो बघून अनेकांना धक्का बसतो तर अनेकांच्या छातीतली धडधड वाढते. एखाद्या व्यक्तीचे हात असे कसे असू शकतात हा प्रश्न तो पाहिल्यानंतर पडल्याशिवाय रहात नाही. त्याच्या हाताच्या तळव्यांना अक्षरश: शेकडो भोके पडलेली दिसून येतात आणि त्यातून रक्तस्त्रावही होताना दिसतो. त्याला कोणतातरी रोग झाला आहे, असे पाहणाऱ्याला वाटते आणि ते त्याच्यासंबंधी हळहळ व्यक्त करतात. तर काही लोक त्याने सुरवातीपासूनच या रोगावर उपचार का करुन घेतले नाहीत असा प्रश्न विचारतात.
तथापि, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असता या सर्व प्रकाराचा रहस्यभेद होतो. हा हातांना झालेला रोग नसून जगप्रसिद्ध मेकप कलाकार ब्रिगेट ट्रेव्हिनो याच्या कलेचा हा आविष्कार असल्याचे स्पष्ट होते. त्याने सदर व्यक्तीच्या हातावर अशा प्रकारे मेकप केला आहे, की तो पाहताना अत्यंत किळसवाणा वाटतो. तथापि, अखेरीस या व्यक्तीचे खरे हात दाखविण्यात येतात जे सर्वसामान्यांच्या हातासारखेच असल्याचे दिसून येते. व्हिडीओ पाहणाऱ्यांना नंतर एकदम हायसे वाटते.
हा व्हिडीओ आतापर्यंत अक्षरश: लाखो लोकांनी पाहिला आहे. ज्यांना तो पूर्णत: पाहवला नाही आणि त्यामुळे त्यांनी तो अर्धवटच पाहिला, ते खचितच हळहळतात आणि अशा हातांच्या व्यक्तीचे आयुष्य कसे जात असेल असा प्रश्न त्यांना पडतो. पण ज्यांनी तो पूर्ण पाहिला आहे, ते लोक या मेकप कलाकाराचे कौतुक केल्याशिवाय रहात नाहीत. सोशल मिडियावर नेहमीच असे काही अजब व्हिडीओ आपल्याला पहावयास मिळतात. पण हा त्यांच्यातही खास आहे.









