बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्या आवाहनाप्रमाणे बेळगावमधील शेकडो कार्यकर्ते शुक्रवारी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. बेळगाव, कंग्राळी व खानापूर येथील हुतात्मा दिनाचे कार्यक्रम आटोपून आपापल्या वाहनांनी कार्यकर्ते कोल्हापूरला निघाल्याने पुन्हा एकदा भगवे वादळ दिसून आले. बेळगाव जिल्ह्याच्या परिसरातील जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलन करून महाराष्ट्र सरकारकडे दाद मागितली जाणार आहे. याची सुरुवात शुक्रवारी कोल्हापूरपासून करण्यात आली. यानंतर सांगली, सोलापूर, पुणे व मुंबई येथे आंदोलने केली जाणार असल्याचे म. ए. समितीने स्पष्ट केले होते. सकाळी 11.30 च्या सुमारास काकती येथील बर्डे ढाबा येथे कार्यकर्ते एकत्रित झाले. तेथून कोल्हापूरच्या दिशेने कार्यकर्ते रवाना झाले.
टोलमाफीसाठी पत्र
दुचाकी, चारचाकी वाहनांनी कार्यकर्ते कोल्हापूरला जाणार असल्याने या वाहनांना टोलमाफी करावी, अशा मागणीचे पत्र मध्यवर्ती म. ए. समितीने कोगनोळी येथील टोल चेकपोस्ट अधिकाऱ्यांना दिले. कोल्हापूरला जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर म. ए. समितीचे पोस्टर लावण्यात आले असून त्यांना टोल माफ करावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली.









